डोंबिवली – डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक भागात वर्दळीच्या रस्त्यावर रिक्षा उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या, तसेच मानवी जीवितास धोका होईल अशा पध्दतीने रिक्षा उभी करून ठेवणाऱ्या दोन रिक्षा चालकांवर विष्णुनगर पोलिसांनी स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. वाहतूक पोलिसांबरोबर पोलिसांनीही बेशिस्त रिक्षा चालकांविरुध्द कारवाई सुरू केल्याने रिक्षा चालकांमध्ये अस्वस्थता आहे.
राहुल रमेश कुमरे (२०) असे रिक्षा चालकाचे नाव आहे. तो डोंबिवली पश्चिमतील मोठागाव भागात राहतो. विष्णुनगर पोलीस ठाण्याचे हवालदार श्रीराम मिसाळ, आंबिवले, अंकुलकर रेल्वे स्थानक परिसरात गस्त घालत होते. त्यांना रिक्षा चालक राहुल कुमरे हा रिक्षा वाहनतळ सोडून महात्मा गांधी रस्त्यावरील रसरंजन हॉटेल समोर प्रवासी वाहतुकीला अडथळा होईल अशा पध्दतीने रिक्षा उभा करून होता. रस्त्यात रिक्षा उभी केल्याने पादचारी, वाहतुकीला अडथळा येत होता. गस्तीवरील पोलिसांनी रिक्षा चालक राहुल कुमरे यास नियमबाह्य पध्दतीने रिक्षा रस्त्यावर उभी केली असल्याचे सांगितले. यामुळे अपघात होण्याची, वाहतुकीला अडथळा होत असल्याची कारणे देत त्याच्यावर भारतीय न्याय संहितेने गुन्हा दाखल केला आहे.
अशाच पध्दतीने हनुमंत दत्तात्रय पष्टे (५०) हे रिक्षा चालक डोंबिवली पश्चिमेतील सर्वाधिक वर्दळीच्या विष्णुनगर मासळी बाजाराच्या ठिकाणी रिक्षा वाहनतळ सोडून प्रवासी वाहतुकीसाठी उभे होते. ते गणेशनगर भागात राहतात. विष्णुनगर मासळी बाजार भागात रेल्वे स्थानकातून बाहेर येणारे प्रवासी, महात्मा गांधी रस्ता, कोपर उड्डाण पूल, गुप्ते रस्ता भागातून पादचारी, वाहने येत असतात. त्यामुळे या रस्त्यावर सतत गर्दी असते. या गर्दीच्या भागात हनुमंत पष्टे यांनी वाहतुकीला अडथळा होईल अशा पध्दतीने बेशिस्तीने रिक्षा उभी केली. वेगात असलेल्या वाहनाची धडक रिक्षेला बसली तर अपघाताची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी हनुमंत पष्टे यांच्यावर विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक भागात २० ते २५ वयोगटातील तरूण मूळ मालकांच्या भाड्याने रिक्षा घेऊन प्रवासी वाहतूक करतात. झटपट प्रवासी मिळवून अधिकचे पैसे कमविणे हा त्यांचा उद्देश असतो. रिक्षा वाहनतळावर उभे राहून वेळखाऊ करण्यापेक्षा ते रेल्वे प्रवेशद्वार, रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी रिक्षा उभी करून प्रवासी वाहतूक करतात. ज्येष्ठ रिक्षा चालकांना हे तरूण रिक्षा चालक दाद देत नाहीत. त्यामुळे ज्येष्ठ रिक्षा चालक शांत राहणे पसंत करतात. या बेशिस्त रिक्षा चालकांमुळे वाहनतळावरून प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर अन्याय होतो.
रिक्षा चालकांनी मनमानी पध्दतीने वर्दळींच्या रस्त्यावर रिक्षा वाहनतळ सुरू केले आहेत. त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. चौथ्या आसानावरून प्रवासी घेऊन वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई सुरूच आहे.