डोंबिवली – बेकायदा इमारती, मालमत्तांचे, पालिकेच्या बनावट बांधकाम परवानग्या तयार करणाऱ्याचे डोंबिवली माहेरघर म्हणून ओळखले जाते. ही बनावट यंत्रणा चालविणाऱ्या माफियांवर गेल्या तीस वर्षात शासन, पोलीस यंत्रणांकडून कधीच कोणती कारवाई न झाल्याने या माफियांना बनावट कागदपत्रे तयार करण्यास बळ मिळत आहे. आता तर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी यांच्या बनावट सह्या, शिक्क्यांचा वापर करून डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयाजवळील एका विवादित जमिनीचा बनावट आदेश काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे.
हा प्रकार विवादित जमीन तक्रार प्रकरणातील तक्रारदाराच्या निदर्शनास येताच त्यांनी ही माहिती महसूल मंत्री कार्यालयाला दिली. त्यानंतर हा बनावट आदेशाचा प्रकार उघडकीला आला. याप्रकरणी महसूल विभागाने केलेल्या चौकशीनंतर विष्णुनगर पोलीस ठाण्यात कल्याणच्या प्रांत कार्यालयातील महसूल साहाय्यक लक्ष्मण रामचंद्र नांगरे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात सरकार पक्षार्फे तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.
डोंबिवली पश्चिमेतील महसुली हद्द मौज आयरे कोपर रस्त्यावरील शास्त्रीनगर रुग्णालयाजवळील सर्वे क्र. ३४-५, ३९-११, ४०-१ई, ८६-२ या जमिनीचा हा वाद आहे. जनार्दन सुदाम म्हात्रे विरूध्द आशाबाई कैलास पाटील यांच्यात शास्त्रीनगर रुग्णालयाजवळील जमिनीवरून महसूल विभागाकडे दावे दाखल आहेत. त्यावर सुनावण्या सुरू आहेत. उपविभागीय अधिकारी, जिल्हा महसूल विभाग, कोकण महसूल विभागाकडून हे प्रकरण अंतीम सुनावणीसाठी महसूल मंत्री यांच्याकडे दाखल आहे, असे पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणातील अर्जदार काटईचे सुरज कैलास पाटील यांना रिदम रमेश म्हात्रे यांच्याकडून समजले की महसूल मंत्र्यांकडे असलेल्या शास्त्रीनगर रुग्णालयाजवळील विवादित जमिनीबाबत महसूल मंत्री कार्यालयाने एक आदेश काढला आहे. परंतु, महसूल मंत्री यांच्याकडे विवादित जमिनीची सुनावणी प्रलंबित आहे. याप्रकरणी आम्हाला अद्याप काही कळविले नाही असे असताना हा अंतीम आदेश काढला कोणी, असा प्रश्न सुरज यांना पडला.
हा आदेश सुरज पाटील यांना मिळाला. याविषयीची तक्रार सुरज पाटील यांनी महसूल मंत्री कार्यालयाकडे केली. त्यावेळी महसूल विभागाने केलेल्या चौकशीत तो बनावट आदेश महसूल मंत्री, तेथील विशेष कार्य अधिकारी कुंदनकुमार सोनवणे यांच्या बनावट सही, शिक्क्याने काढला असल्याचे निष्पन्न झाले. या आदेशाचा नस्ती क्रमांक महसूल मंंत्री कार्यालयाशी विसंगत असल्याचे आढळले. महसूल मंत्री कार्यालयाच्या आदेशावरून जिल्हाधिकारी कार्यालयाने हे बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या अज्ञात इसमावर कारवाई करण्याचे आदेश कल्याणचे उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांना दिले.
गुजर यांच्या आदेशावरून उपविभागीय कार्यालयातील महसूल साहाय्यक लक्ष्मण नांगरे यांनी याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत महसूल मंत्र्यांच्या सहीचा आणि कार्यालयाचा बनावट आदेश अज्ञाताने काढला आहे. मागील पाच वर्षापासून शास्त्रीनगर रुग्णालयाजवळील विवादित जमीन प्रकरणाच्या महसूल विभागाकडे सुनावण्या सुरू आहेत. पोलीस उपनिरीक्षक नवनाथ वाघमोडे याप्रकरणाचा तपास करत आहेत.
