कल्याण – कल्याण पश्चिमेतील बारावे भागात माळरानावर चरत असलेल्या गाईंना दुचाकीवरून आलेल्या दोन तरूणांनी पहिले चपात्या खाण्यास दिल्या. त्यानंतर त्यामधील एका कपिला गाईला चपाती खाण्या बरोबर दोन्ही तरूणांनी एक इंजेक्शन दिले. आणि तेथून पळून गेले. काही वेळानंतर माळरानावर चरत असताना कपिला गाईला विषार होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. अशी तक्रार गाईच्या मालकाने खडकपाडा पोलीस ठाण्यात केली आहे.

असे प्रकार मागील काही वर्षापासून ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर ग्रामीण भागात रात्रीच्या वेळेत होतात. मध्यरात्रीच्या वेळेत गावाच्या बाहेर गोठणीवर बसलेल्या गाई, वासरे, बैलांना खाण्याचे आमिष दाखवायचे. त्यानंतर त्यांना घातक इंजेक्शन देऊन त्याला तेथे बेशुध्द करून वाहनात टाकून चोरून न्यायायचे असे प्रकार यापूर्वी घडले आहेत. शहापूर तालुक्यातील डोळखांब, कसारा, खर्डी, भिवंडी ग्रामीण भागात अशा चोरांना यापूर्वी ग्रामस्थांनी पकडले आहे. त्यांच्यावर स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या आहेत.

असे प्रकार आता शहरी भागातही सुरू झाल्याने कल्याण, डोंबिवली शहरी भागात घरगुती पध्दतीने दूध विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

कल्याण, डोंबिवली शहराच्या काही भागात अद्याप काही शेतकरी गाई, म्हैस पाळून स्थानिक पातळीवर दूध विक्रीचा व्यवसाय करतात. गोपालन त्यांचा व्यवसाय आहे. या माध्यमातून ते आपली उपजीविका करतात. अशाच प्रकारचा गोपालन व्यवसाय कल्याण पश्चिमेतील बारावे गावात रामचंद्र निवासमध्ये राहणारे तन्मय तुषार मिरकुटे करतात. त्यांच्या गाई आहेत. तन्मय स्वता किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य सकाळ, संध्याकाळ गाई बारावे गाव हद्दीतील माळरानावर चरण्यासाठी नेतात.

रविवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे तन्मय मिरकुटे यांनी आपल्या गाई बारावे गावाजवळील वाधवा इमारतीच्या बाजुला ऑलम्पिया जीम जवळ असलेल्या नवीन रस्त्या लगतच्या माळरानावर चरण्यासाठी सोडल्या होत्या. गाई चरत असताना अचानक त्या माळरानावर दोन इसम दुचाकीवरून आले. त्यांनी दुचाकी थांबवून जवळील चपात्या गाईंना खाण्यासाठी दिल्या. गाई चपात्या खात असताना अचानक दुचाकीवरून इसमांनी काळ्या रंगाच्या कपिला गाईला जवळील एक इंजेक्शन दिले. इंजेक्शन दिल्यानंतर हे दोन्ही तरूण दुचाकीवरून पळून गेले. हे तरूण गेल्यानंतर काही वेळाने इंजेक्शन दिलेल्या कपिला गाईला अस्वस्थ होऊ लागले आणि ती माळरानावर कोसळली. तिथेच तिचा मृत्यू झाला.

कपिला गाईला कोणताही आजार नसताना ती चरत असताना तिला दोन तरूणांनी दिलेल्या इंजेक्शनमुळे तिचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करत गाईंचा मालक तन्मय मिरकुटे यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ. अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला साहाय्यक पोलीस निरीक्षक आर. आर. दागंट तपास करत आहेत.