कल्याण – कल्याण मधील ज्येष्ठ साहित्यिक, मध्य रेल्वे कामगार संघटनेचे सचिव रमेश करमरकर यांचे पुणे येथे वृध्दापकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात राष्ट्रसेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या स्नेहल करमरकर, मुलगी ज्येष्ठ तबला वादक स्वप्नगंधा करमरकर आहेत.

कल्याण मधील पुल कट्टा संघटनेचे ते संस्थापक सदस्य होते. अनेक वर्ष पुल कट्ट्याच्या माध्यमातून रमेश करमरकर यांनी आपल्या सहकार्यांच्या माध्यमातून विविध साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रम कल्याणमध्ये घडवून आणले. मध्य रेल्वेत ते नोकरीला होते. रेल्वेतील सेवेच्या काळात रमेश करमरकर यांनी मध्य रेल्वे कामगार संघटनेचे ३५ वर्ष सचिवपद सांभाळले. कामगारांच्या हक्कासाठी लढा देणारा एक तळमळीचा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती.

रेल्वे कर्मचारी पतपेढीत कार्यरत असताना अनेक रेल्वे कामगारांना त्यांनी मदत केली. कामगारांच्या अडचणी समजून घेऊन त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. लोकप्रिय कामगार नेता अशी त्यांची ओळख होती. ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी निमित्त कल्याण मधील पुल कट्ट्याने बाल कला संमेलन, पोलीस प्रतिभा संमेलने आयोजित केली होती. या संमेलन काळात रमेश करमरकर आपले वय विसरून तरूणांबरोबर या संंमेलनांमध्ये सहभागी झाले होते.

रेल्वेत नोकरीला असताना ते सुट्टी, मिळणाऱ्या वेळेत लेखन करत होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी पूर्णवेळ स्वताला लेखन साधनेत गुंतून घेतले. ‘गुंफियेला शेला’ या पुस्तकातून त्यांनी आपले संपूर्ण लेखन जतन केले आहे. श्री रेणुका कला मंदिरासाठी त्यांनी केलेल्या लेखनामुळे संस्थेला अनेक भाविकांचे साहाय्य मिळाले. कल्याण शहरातील अनेक सामाजिक संस्था, संघटनांशी त्यांचा निकटचा संबंध होता. त्यांच्या अंत्ययात्रेत पुल कट्ट्याचे त्यांचे कल्याण मधील जुने सहकारी, कल्याणमधील साहित्यिक क्षेत्रातील प्रवीण देशमुख आणि इतर मान्यवर उपस्थित होते.