ठाणे : शिळफाटा महापेच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनाचा अपघात झाल्याने शिळफाटा आणि मुंब्रा बाह्यवळण मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मुंब्रा बाह्यवळण मार्गावर शिळफाटा ते मुंब्रा देवी मंदिर आणि शिळफाटा मार्गावर पलावा सिटी पर्यंत कोंडी झाली आहे. त्यामुळे नवी मुंबई, ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांचे हाल झाले आहेत. अवघ्या १० मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी वाहन चालाकांना २५ ते ३० मिनीटे लागत आहेत.

भिवंडी, गुजरात येथून हजारो अवजड वाहने उरण येथील जेएनपीटी बंदराच्या दिशेने वाहतुक करत असतात. बुधवारी सकाळी शिळफाट्याजवळील नवी मुंबईच्या दिशेने वाहतुक करणारे अवजड वाहन बंद पडले. या घटनेनंतर तो वाहन चालक तेथून फरार झाला. वाहनामध्ये मोठ्याप्रमाणात साहित्य असल्याने वाहतुक पोलिसांना हे अवजड वाहन हटविताना नाकी नऊ आले. मुंब्रा बाह्यवळण मार्ग, शिळफाटा, कल्याणफाटा भागातून हजारो हलकी, अवजड वाहने वाहतुक करत असतात.

कल्याण, डोंबिवली, ठाणे शहरातून हजारो नागरिक याच मार्गाने नवी मुंबईत जात असतात. अवजड वाहन बंद पडल्याने येथील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. त्याचा परिणाम येथील वाहतुक व्यवस्थेवर झाला आहे. वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. कल्याणफाटा, शिळफाटा, मुंब्रा बाह्यवळण मार्ग, शिळफाटा, महापे मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी झाली आहे. अवघ्या १० ते १५ मिनीटांचे अंतर पार करण्यास वाहन चालकांना सुमारे अर्धा तास लागत आहे. काही वाहन चालकांनी विरुद्ध दिशेने वाहतुक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे वाहतुक कोंडीत आणखी भर पडली.

मुंब्रा बाह्यवळण मार्गावर शिळफाटा ते मुंब्रा देवी मंदिर परिसर पर्यंत वाहतुक कोंडी झाली आहे. तर, शिळफाटा मार्गावर शिळफाटा ते पलावा सिटी पर्यंत वाहतुक कोंडी झाली आहे. शिळफाटा मार्गावरही शिळफाटा ते महापे मार्गावर कोंडी वाढली आहे. वाहतुक पोलिसांकडून येथील वाहतुक कोंडी सोडविताना नाकी नऊ आले आहेत.