ठाणे : मुंब्रा-कौसा येथील लकी कंपाऊंडमधील मोठ्या इमारत दुर्घटनेनंतरही आपण काहीतरी शिकायला हवे होते. पण, अधिकारी हे शिकायलाच तयार नाहीत. अवघ्या चार – चार दिवसात स्लॅब भरणे हे एल अँड टी ला शक्य नाही. ते येथील स्थानिक बिल्डर्स करून दाखवत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यमांवरून पालिका अधिकाऱ्यांवर केली आहे. आपण एक नवीन लकी कंपाऊंड घडण्याची वाट पहात आहोत, असेच हे सर्व पाहून वाटत असल्याचे सांगून त्यांनी बेकायदा बांधकामाच्या मुद्द्यावरून संताप व्यक्त केला आहे.

अकरा वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी मुंब्रा-कौसामधील लकी कंपाऊंड येथे पत्त्याच्या बंगल्यासारखी एक इमारत कोसळली. या दुर्घटनेत ७४ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर प्रचंड गदारोळ झाला. अनेकजण तुरूंगात गेले. या घटनेनंतर जवळपास ८ वर्षे मुंब्रा, कौसा भागात एकही अनधिकृत बांधकाम उभे राहिले नव्हते. आता मात्र अधिकारी आणि बिल्डर यांच्या संगनमताने इतक्या अनधिकृत इमारती बांधल्या जातात की त्या इमारतींच्या संख्येवर विश्वासही बसणार नाही, असा आरोप आव्हाड यांनी केला आहे.

हेही वाचा : कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवाॅकवर मजुरावर चाकू हल्ला, मजुरीचे दोन हजार रूपये लुटले

एवढ्या मोठ्या दुर्घटनेनंतरही आपण काहीतरी शिकायला हवे होते. पण, अधिकारी हे शिकायलाच तयार नाहीत. अवघ्या चार – चार दिवसात स्लॅब भरणे हे एल अँड टी ला शक्य नाही. ते येथील स्थानिक बिल्डर्स करून दाखवत आहेत. आपण एक नवीन लकी कंपाऊंड घडण्याची वाट पहात आहोत, असेच हे सर्व पाहून वाटते. आज ना उद्या मरणारच आहेत तर हे इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबून मेले तर काय फरक पडतो, अशीच भावना महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांची झाली आहे, असा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजपचा दावा का? भाजपच्या विस्तारवादाने शिंदेसेना भयग्रस्त?

आयुक्त नवीन आहेत, त्यांना काही समजण्याच्या आत कामे पूर्ण करा, असा संदेश अधिकारीच एकमेकांना देत आहेत. परंतु ठाणे महापालिकेचे आताचे आयुक्त सौरव राव हे अत्यंत कर्तव्यदक्ष तसेच नियमांच्या बाहेर कोणतेही काम न करणारे आहेत, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. म्हणूनच, खालच्या अधिकाऱ्यांच्या बोलण्यावर जाऊ नका, लाखोंचे नुकसान होईल. वाचवायला कुणीच येणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.