ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे ठाणे शहरातील काही भागात शुक्रवारी २४ तासासाठी पाणी पुरवठा बंद राहणार होता. परंतू, काही अपरिहार्य कारणांमुळे दुरुस्तीचे हे काम पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे शुक्रवारी पाणी पुरवठा नियमित होणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेकडून देण्यात आली.

हेही वाचा : ठाण्यात अवैध व्यवसायांना आश्रय देणाऱ्या पोलिसांवर होणार कारवाई; बेकायदा पब, हुक्का पार्लर, डान्स बारवर कारवाईसाठी स्वतंत्र कक्ष

एमआयडीसीच्या पाणी पुरवठा योजने अंतर्गत बारवी गुरुत्व जलवाहिनीच्या कटाई नाका ते शीळ टाकी येथे तातडीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार होते. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात एमआयडीसीचा पाणी पुरवठा शुक्रवारी रात्री १२ वाजेपासून २४ तासासाठी बंद राहणार होता. या कालावधीत महापालिका क्षेत्रातील दिवा, मुंब्रा (प्रभाग क्रमांक २६ व ३१ येथील काही भाग वगळता ), कळवा, वागळे इस्टेट, रुपादेवी पाडा, किसननगर क्रमांक दोन, नेहरुनगर तसेच कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहील. त्यानंतर, पुढील एक ते दोन दिवस पाणी पुरवठा कमी दाबाने होईल असे महापालिकेकडून सांगण्यात आले होते. परंतु, दुरुस्तीचे काम काही कारणांमुळे पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे शहरात शुक्रवारी पाणी पुरवठा नियमित होणार आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेकडून देण्यात आली.