ठाणे : ठाणे शहरात शनिवारी आणि रविवारी या दोन दिवसातील पावसामुळे घोडबंदर मार्ग, माजिवडा उड्डाणपूलावर पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले आहे. या खड्ड्यांमुळे वाहतुक कोंडी आणि अपघाताची भिती व्यक्त केली जात असून अवघ्या दोन दिवस सुरु असलेल्या पावसामुळे खड्डे पडल्याने नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया उपटत आहे. मंबई नाशिक महामार्गावर खड्डे बुजविण्याच्या कामामुळे वाहतुक कोंडीचा फटका नागरिकांना सहन करावा लागला.
घोडबंदर मार्गावर खड्डे आणि वाहतुक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले असून त्यांना तीनवेळा रस्त्यावर उतरण्याची वेळ आली होती. घोडबंदर मार्गावरील कोंडी सोडविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर अनेक बैठका झाल्या. तसेच काही कालावधीसाठी अवजड वाहतुक काही दिवस बंद करावी लागली होती. अद्यापही रस्त्यावरील खड्डे आणि त्यामुळे होणारी वाहतुक कोंडीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
ठाण्यात शनिवारी आणि रविवारी मुसळधार पाऊस पडला. या दोन दिवसांच्या पावसामुळे शहरात पुन्हा एकदा खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शहरातील माजिवाड उड्डाणपूल, घोडबंदर येथील आनंदनगर, वाघबीळ, कापूरबावडी येथे ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अक्षरशः धोकादायक प्रवास करावा लागतो. दुचाकी आणि पादचारी विशेषतः धोक्यात आहेत. वाहतूक कोंडीत अडकून राहणाऱ्या नागरिकांचा वेळ वाया जात आहे, इंधनाचा अतिरिक्त खर्च होत आहे आणि मानसिक तणावही वाढत आहे.
घोडबंदर मार्गावर मागील काही वर्षांपासून मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाची कामे सुरू आहेत. त्याचा परिणाम देखील होत आहे. मेट्रो मार्गिकेसाठी अनेक ठिकाणी खड्डे खणले होते. या खड्ड्याची कामे झाल्यानंतरही दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे मुख्य रस्ते निमुळते झाले आहेत.
घोडबंदर येथील सेवा रस्त्याचे मुख्य रस्त्यामध्ये सामावेश केला जात आहे. या प्रकल्पामुळे मुख्य रस्ता आणि नव्याने तयार करण्यात आलेले रस्ते असमान झाले आहेत. या प्रकारामुळे गंभीर अपघाताची भिती व्यक्त केली जात आहे.
ठाणेकरांना खड्डे नेहमीचे झाले आहेत. खड्डे बुजविले नाही तर एखाद्या गंभीर अपघाताला सामाेरे जावे लागण्याची शक्यता आहे. – रमेश देसले, प्रवासी.
मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका भागात खड्डे बुजविण्याची कामे घेण्यात आली होती. त्याचा परिणाम मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका, साकेत परिसर तसेच मुंब्रा बाह्यवळण मार्गावर कोंडी झाला होता.