ठाणे : मागील काही दिवसांपासून हिंदी भाषा सक्ती करण्यावरून राजकीय वातावरणात अनेक बदल झाल्याचे दिसून आले. अशातच मराठी भाषा जपण्यासाठी ठाकरे बंधु एकत्र आल्याने राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले. तसेच हिंदी भाषा सक्ती विरोधात राज्यभरात आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर राज्य सरकारने हिंदी सक्ती विषयीचा निर्णय मागे घेतला असला तरी या प्रकरणानंतर मराठी विषयीचे प्रेम विविध माध्यमांतून दिसू लागले आहे. यंदा राख्यांमध्येही मराठी भाषेचा मुद्दा उमटतकल दिसून येत आहे.
भाऊ-बहिणीचे नात्याची वीण जपणारा रक्षाबंधन सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यासाठी ठाणे शहरातील बाजारात विविध प्रकारच्या राख्या दाखल झाल्या आहेत. यामध्ये यंदा मराठी भाषेविषयी संदेश देणाऱ्या आशयाच्या राख्या तयार करण्यात आल्या आहेत. या राख्यांवर ‘प्रेमाने बोला मराठी बोला’, ‘रुजवू मराठी बोलू मराठी’, ‘मराठी भाषा गोड’, ‘मी मराठी शिकणार’, ‘आपण मराठी शिकूया’, ‘जय महाराष्ट्र’ असे संदेश देण्यात आले आहेत. इतर राख्या खरेदी केल्यावर ही राखी मोफत दिली जात आहे. यासोबतच दरवर्षीप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे छायाचित्र असलेली राखी देखील मोफत दिली जाणार आहे. यासाठी एकूण ६ प्रकारच्या राख्या तयार केल्या आहे.
यंदा राख्यांमध्ये ३० हून अधिक विविध प्रकार पाहायला मिळत आहेत. लहान मुलांसाठी विश्वचषक, कॅमेरा, मॅगी, बर्गर, स्कूटर, चंद्रयान, हत्ती, शिव राजमुद्रा अशा विविध गोष्टींच्या राख्या दाखल झाल्या आहेत. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ यांची छोटी प्रतिमा आणि त्याखाली स्वामी असे अक्षरात लिहिलेली राखी देखील पाहायला मिळत आहे. तसेच कुंदन, कार्टून, पर्यावरण पूरक, गोंडा, सोने – चांदी, रेशमी, फॅन्सी राख्या उपलब्ध आहे. ठाणे शहरातील वामाक्षी राखी या दुकानांत ५० महिलांच्या मदतीने राखी तयार केली जाते. येथे एक रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंत राख्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
प्रतिक्रिया
महाराष्ट्रामध्ये जे काही घडत आहे असे घडायला नको यासाठी आम्ही राखीच्या माध्यमातून नागरिकांना संदेश देत आहोत. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्यावेळी ठाण्याचे मुख्यमंत्री झाले होते तेव्हापासून आम्ही त्यांच्या छायाचित्राची राखी तयार करत आहोत. यंदा टेंभी नाक्याचे शाखाप्रमुख निखिल बुडजडे यांच्या छायाचित्राची देखील राखी मोफत विक्रीसाठी ठेवली आहे. – विराग गांगर, विक्रेते