ठाणे : गेल्याकाही वर्षांमध्ये घोडबंदर मार्गाची झालेली दैना, मेट्रो मार्गिकेची कामे, वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी अपुऱ्या उपाययोजना, अवजड वाहनांची घुसखोरी आणि अपघात यामुळे जिल्ह्यात घोडबंदर भाग कोंडीचे केंद्रबिंदू ठरू लागला आहे. सलग दुसऱ्या दिवशी या मार्गावर वाहतुक कोंडी झाली. मेट्रो मार्गिकेच्या तुळई उभारण्याच्या काम सकाळी उशीरापर्यंत सुरू राहिल्याने ही वाहतुक कोंडी झाली. कोंडीमुळे अनेक विद्यार्थी सकाळच्या सत्रात वेळेत शाळेमध्ये पोहचू शकले नाही. रोंजदारीवर असलेल्या नोकरदारांना वेळेत कामाच्या ठिकाणी जाता आले नाही. तर अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडलेल्या नागरिक देखील कोंडीत अडकले होते. प्रवासी आणि विद्यार्थ्यांचे पालक कोंडीमुळे चिंतेत होते. महिला प्रवाशी अक्षरश: रडकुंडीला आल्या होत्या. तर काही प्रवासी संताप व्यक्त करत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुपारच्या सत्रातील काही शाळांनी सुट्टी जाहीर केली होती. रिक्षा, बसगाड्यांच्या थांब्यावर प्रवाशांची गर्दी झाली होती. परंतु बसगाड्या उपलब्ध नव्हत्या. सर्व अंतर्गत मार्गांवर कोंडी झाली होती. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना देखील घराबाहेर पडणे कठीण झाले होते. अंतर्गत मार्गावरील कोंडी सोडविण्यासाठी स्थानिक परिसरातील नागरिकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली.

हे ही वाचा… डोंबिवलीतील रिजेन्सी इस्टेट, गृहसंकुलातील क्लब हाऊसला आग

घोडबंदर येथील पातलीपाडा भागात रायायनिक पदार्थ वाहून नेणारा कंटेनर उलटल्याने तब्बल १३ तास वाहतुक कोंडीमुळे हैराण झालेल्या घोडबंदरमधील रहिवाशांना कोंडीच्या मनस्तापातून बाहेर पडण्यास २४ तास उलटले नसतानाच दुसऱ्या दिवशी देखील कोंडीचा सामना करावा लागला. बुधवारी कोंडीचे निमत्त होते अपघात. तर गुरुवारी मेट्रो मार्गिकेच्या कामांमुळे घोडबंदर ठप्प झाला. घोडबंदर मार्गावर मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. या कामासाठी एमएमआरडीएला मध्यरात्री गर्डर उभारणीची कामे करावी लागतात. पहाटे पाच पर्यंत या कामाला परवानगी होती. परंतु सकाळी ६.३० वाजेनंतरही कामे पूर्ण झाली नाहीत. त्याचा थेट परिणाम वाहतुक व्यवस्थेवर झाला. बुधवारपेक्षा गुरुवारी कोंडीचे प्रमाण अधिक होते. पहाटेपासूनच कोंडीला सुरूवात झाली होती. घोडबंदर मार्गावरील मुख्य मार्गावर मानपाडा ते गायमुख पर्यंत वाहतुक कोंडी झाली होती. तर अंतर्गत मार्गावर मानपाडा, कोलशेत, ब्रम्हांड रोड, ढोकाळी, कापूरबावडी, साकेत रोड परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहन चालकांना अवघ्या १० ते १५ मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी दोन ते तीन तास लागत होते. त्यामुळे नागरिकांमधून रोष व्यक्त होत होता.

हे ही वाचा… ठाण्यात १५८ गणेशोत्सव मंडळे मंडप परवानगीच्या प्रतिक्षेत,३०७ पैकी १४९ गणेशोत्सव मंडपांना परवानगी

शाळेतून सुटलेले विद्यार्थी कोंडीमुळे अडीच ते तीन तास बसगाडीतच बसून होते. त्यामुळे मुले घरी येतील का अशी चिंता पालकांना सतावत होती. तर बसगाड्यांच्या थांब्यावर प्रवासी बसगाडयांच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु त्यांना बसगाड्या उपलब्ध होत नाहीत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane traffic jam at ghodbunder road on second day in a row asj