ठाणे : बेघर, निराधार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास विभागाच्यावतीने ‘ज्ञानगंगा फिरती शाळा’ हा अभिनव उपक्रम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मे महिन्यात घेण्यात आला होता. शासनाने या प्रकल्पासाठी निधीही मंजूर केला होता. मात्र प्रत्यक्षात आजतागायत हा उपक्रम सुरू झालेला नाही. त्यामुळे गरजू मुले अजूनही शिक्षणासाठी या फिरत्या शाळेच्या प्रतीक्षेत आहेत.

राज्य शासनाच्या महिला आणि बाल विकास विभागातर्फे बेघर मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तीन वर्षांपूर्वी जिल्ह्यात फिरती शाळा उपक्रम हाती घेण्यात आला. राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये एकत्रितरीत्या हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली होती.

या उपक्रमाध्ये एका बसद्वारे मुलांना त्यांच्या राहत्या विभागात जाऊन शिक्षण दिले जाते. यात प्रामुख्याने झोपडपट्टी विभाग, उड्डाणपूल, सिग्नल याठिकाणी राहणारी मुले यांना शिक्षण देण्यात येत होते. यासाठी संस्थेच्या माध्यमातून नियुक्त केलेले शिक्षण विद्यार्थ्यांना नियमित स्वरूपात शिक्षण देत होते.

हा प्रकल्प तीन वर्षांपूर्वी सुरू झाल्यावर सुरुवातीचे सहा ते सात महिन्यांच्या काळात नियमित स्वरूपात निधी आला. मात्र, त्यानंतर सरकारकडून हा प्रकल्प सुरू ठेवण्यासाठी निधीची उपलब्धता करण्यात आली नाही.यामुळे निधी अभावी जिल्हा प्रशासनाला हा प्रकल्प बंद करावा लागला. यामध्ये देखील ठाणे जिल्ह्यातील प्रवास संस्थेच्या माध्यमातून काही महिने स्व खर्चावर हा प्रकल्प चालू ठेवला. मात्र काही महिन्यानंतर संस्थेचे देखील आर्थिक गणित बिघडू लागल्याने त्यांना नाईलाजाने फिरती शाळा उपक्रम बंद करावा लागला.

याबाबत संस्थेच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा देखील सुरू होता. याच पार्श्वभूमीवर मे महिन्यात पार पडलेल्या राज्यमंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आणि राज्यातील अशा २९ महापालिकेतील फिरती शाळा सुरू होणार असून यासाठी शासनाच्या माध्यमातून ८ कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. मात्र याला आता पाच महिन्यांहून अधिकचा कालावधी लोटला आहे. अजून ही हा उपक्रम जिल्ह्यात सुरू झालेला नाही. यामुळे गरजू मुलांना अजून ही यासाठी काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मे महिन्यात हा उपक्रम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय झाल्यावर यासाठी इच्छुक संस्थांनी प्रस्ताव पाठविण्याची जाहिरात शासनाकडून देण्यात आली होती. तर याबाबत ठाणे जिल्ह्यातून ३० हुन अधिक अर्ज पाठविण्यात आले आहेत. मात्र ही प्रक्रिया अजून ही प्रस्ताव पाठविण्याच्या स्तरावर असल्याची माहिती जिल्हा महिला बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर या संस्थांच्या प्रस्तावातून छाननी करून मग हा उपक्रम सुरू होईल. तर याला अजून सुमारे दोन महिन्यांचा कालावधी जाईल अशी माहिती मिळाली आहे.