डोंबिवली – डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक आणि एक एच्या (डोंबिवली लोकलचा फलाट) दिवा रेल्वे स्थानक दिशेने अनेक प्रवासी रेल्वे मार्ग ओलांडून, रेल्वे मार्गातून दररोज प्रवास करायचे. अनेक पालक, विद्यार्थी या रेल्वे मार्गाचा वापर करत होते. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या विचारातून रेल्वे प्रशासनाने डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक एवर लोखंडी रोधक बसवून प्रवाशांचा रेल्वे मार्गातून जाण्याचा मार्ग बंद केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक एवर उतरणारे बहुतांशी प्रवासी सरकते जिने, जिन्यावरून रेल्वे स्थानकाबाहेर न जाता मधला मार्ग म्हणून फलाट क्रमांक ए आणि एक ए या दरम्यानच्या दिवा रेल्वे स्थानक बाजुकडील मधल्या मार्गाने फलाटावरून रेल्वे मार्गात उड्या मारून येजा करायचे. अनेक वेळा हा मार्ग ओलांडताना समोरून लोकल येत असेल तर प्रवाशांची गडबड उडायची. रेल्वे सुरक्षा जवान, लोहमार्ग पोलिसांनी वेळोवेळी अशा रेल्वे मार्गातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली आहे. पण, प्रवासी त्या कारवाईलाही दाद देत नव्हते. विशेष म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ डोंबिवली पूर्व, पश्चिमेतून शाळेत जाणारी मुले आपल्या पालकांसोबत रेल्वे जिन्यावरून जायायला नको म्हणून रेल्वे मार्गातून पूर्व, पश्चिम भागात जात होती. दररोज कारवाई करूनही प्रवासी ऐकत नसल्याने फलाट क्रमांक एक एवर लोखंडी अडथळे उभारण्याचा प्रस्ताव डोंबिवली रेल्वे प्रशासनाने वरिष्ठांना पाठविला होता. या अहवालाची दखल घेऊन डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांंक एक एवर लोखंडी अडथळे बसविण्यात आले आहेत.

हेही वाचा – कल्याणमध्ये मुलीच्या लग्नाला विरोध केल्यास आईला ठार मारण्याची धमकी

हेही वाचा – डोंबिवली जवळील पिसवलीत राहुलभाई पाटीलच्या गुंडांची दहशत

अशाप्रकारे लोखंडी अडथळे बसविल्याची माहिती नसल्याने अनेक पालक, विद्यार्थी, प्रवासी फलाट क्रमांक एक एवरून रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी येत आहेत. परंतु, तेथील लोखंडी अडथळे पाहून त्यांना माघारी जाऊन सरकते जिने, जिन्यांवरून इच्छित स्थळी जावे लागत आहे. अशाच प्रकारचे कठडे कोपर रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे मार्गात रेल्वे प्रशासनाने बसविले आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iron barrier on platform number one a of dombivli railway station ssb