राष्ट्रवादी काॅग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर गेल्या महिन्यात दोन दिवसांच्या अंतराने दाखल झालेले दोन गुन्हे, त्यांना झालेली अटक, त्यावरुन त्यांच्यात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये निर्माण झालेली कटुता राज्यभरात चर्चेचा विषय ठरला होता. ठाण्यातील राजकीय परिघात वर्षानुवर्षे पहायला मिळालेला सर्वपक्षीय सुसंवाद या घटनांमुळे संपत आहे का अशी चर्चाही यानिमीत्ताने ऐकायला मिळाली. हा घटनाक्रम ताजा असताना शनिवारी ठाणे महापालिकेच्या एका कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून केलेले ट्वीट भलतेच चर्चेत आले. या ट्वीटच्या अखेरीस आव्हाड यांनी शेक्सपिअर यांच्या ज्युलीअस सिझर यांच्यावरील प्रसिद्ध नाटकातील ’यु टू ब्रुटस’ या संवादाचा केलेल्या उल्लेखाचेही अनेक अर्थ यावेळी काढले जात होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- अश्रुधूर नळकांड्यांच्या धुरामुळे डोंबिवलीतील इंदिरानगरमध्ये घबराट; ठाकुर्लीतील रेल्वे सुरक्षा जवानांचा सराव प्रशिक्षण कार्यक्रम

ठाणे महापालिकेच्या पुढाकाराने शनिवारी ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या अभियानाची सुरुवात करण्यात आली. महापालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी ठाण्यातील इतर सर्वपक्षीय आमदार, खासदार यांनाही आमंत्रण होते. मात्र, कार्यक्रम सुरु होण्यास अर्धा तास आधी राष्ट्रवादी काॅग्रेसचे नेते आणि माजी मंत्री यांनी केलेले ट्वीट चर्चेत आले. या ट्वीटमध्ये त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित न रहाण्यामागे उपहासात्मक पद्धतीने कारण दिले. ‘आज ठाणे महापालिकेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही योजनांचे शुभारंभ आहेत.महापालिकेने मला या कार्यक्रमाचे आमंत्रण दिले आहे. परंतु ब्रिजच्या उद्धाटनात त्यांच्या ८ फुट अंतरावर असताना माझ्यावर ३५४ कलमान्वये गुन्हा दाखल झाला. ते स्वत: साक्षीदार आहेत. आज त्यांच्या बाजूला उभा राहीन आणि पोलीस पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील’ असे ट्वीट त्यांनी केले. पुढे आणखी एक ट्वीट करत त्यांनी ‘ त्यापेक्षा कार्यक्रमाला न गेलेले बरे. पर पोलीस म्हटतील दबाव होता आणि मुख्यमंत्री म्हणतील तुला माहीत आहे ना मी हे करु शकत नाही. चलो ये वक्त भी गुजर जायेगा…’ अशी भावना व्यक्त केली. आव्हाड यांनी या ट्वीटची अखेर शेक्सपिअर यांच्या ज्युलीअस सिझर या व्यक्तीरेखेच्या तोंडी गाजलेल्या ‘ यु टू ब्रुटस’ या वाक्याने केल्याने हा उल्लेख नेमका कुणासाठी याविषयी रंगतदार चर्चा कार्यक्रमस्थळीच ऐकायला मिळाली.

हेही वाचा- “…म्हणून मोदी-शहांनी मला मुख्यमंत्री पदाची संधी दिली”; एकनाथ शिंदेंनी सांगितले कारण

यु टू ब्रुटस …

शेक्सपिअर यांच्या गाजलेल्या ज्युलीअस सिझर नाटकात प्रमुख व्यक्तीरेखा असलेल्या रोमन सम्राट ज्युलीअस सीझर या पात्राच्या तोंडी हे वाक्य आहे. ब्रुटस हा ज्युलीअस सिझर यांचा घनिष्ठ मित्र असतो. मात्र, सिझरच्या हत्येचा कट रचून मारेकरी जेव्हा त्याला भोसकतात तेव्हा ब्रुटसही हातातील सुरा सिझरच्या आरपार करतो. जेव्हा आपल्या मित्रानेच आपल्याला भोसकले हे सीझरच्या लक्षात येते तेव्हा त्या व्यक्तीरेखेच्या तोंडी ‘ यु टू ब्रुटस’ हे वाक्य नाटकात आहे. मित्रानेच घात केला अशा आशयाच्या या वाक्याचे ट्वीट आव्हाड यांनी थेट मुख्यमंत्र्यांना उद्देशून केलेल्या ट्वीटमध्ये केल्याने ते दिवसभर चर्चेत राहीले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad criticize cm eknath shinde in tweet with references to the dialogue shakespeares famous play on julius caesar dpj
First published on: 03-12-2022 at 20:57 IST