Dombivli MIDC Blast Marathi News : डोंबिवलीतल्या एमआयडीसी भागात असलेल्या सोनारपाडा या ठिकाणी एका केमिकल कंपनीत मोठ्ठा स्फोट झाला आहे. या स्फोटांमुळे साधारण तीन ते चार किमीचा परिसर हादरल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच आगीचे लोळ आणि धुराचे लोट हवेत दिसून लागले आहेत. याशिवाय या स्फोटामुळे काही जण जखमी झाल्याचीदेखील शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, या स्फोटानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एमआयडीसीवर आरोप केले आहेत. दोन वर्षांपासून एमआयडीसीकडून कोणत्याही कंपनीचे फायर ऑडिट करण्यात आलेले नाही, असे ते म्हणाले. त्यांनी टीव्ही ९ वृत्तवाहिनीला यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – लोकसत्ता विश्लेषण : डोंबिवली कारखाने स्थलांतर – प्रदूषणातून मुक्ती, रोजगाराचा प्रश्न!

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

“एखादी दुर्घटना घडू नये, यासाठी जी काळजी घ्यायची असते ती प्रशासनिक पातळीवर कधीच घेतली जात नाही. महत्त्वाचे म्हणजे फायर ऑडिटसारखी गोष्ट महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याच विभागाद्वारे केली जात नाही. त्यामुळे आग लागल्यावर ज्या उपाय योजना कराव्या लागतात, त्या योग्य वेळत होते नाही. त्यामुळे आग वाढते आणि अनेकांचा मृत्यू होतो. माध्यमं दोन दिवस बातमी चालवतात. नंतर सगळं विसरून जातात. मृत्यू झालेल्यांना काही आर्थिक मदत दिली जाते. मात्र, त्यानंतर त्या घटनेची कोणतीही चर्चा होत नाही”, अशी संतप्त प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

पुढे बोलताना त्यांनी गेल्या दोन वर्षात एमआयडीसीकडून कोणत्याही कंपनीचे फायर ऑडिट करण्यात आले याची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणीही केली. “डोबिंवलीत दोन वर्षांपूर्वीही अशाच प्रकारची घटना घडली होती. त्यावेळी घराघरात आग पोहोचली होती. त्यानंतर आजपर्यंत अशा घटना घडू नये, यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. तेव्हापासून आजपर्यंत एमआयडीसीने किती कंपन्यांचे फायर ऑडिट केले याची श्वेतपत्र काढावे”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – Dombivli MIDC Blast: डोंबिवली बॉयलर स्फोट प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले, “घटना…”

मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली प्रतिक्रिया

याशिवाय या घटनेबाबत मंत्री रविंद्र चव्हाण यांनीही प्रतिक्रिया दिली. “ज्या भागात हा स्फोट झाला, तो रहिवासी भाग आहे. या भागातून नागरिकांना बाहेर काढण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या स्फोटामुळे अनेक इमारतींच्या काचा फुटला आहेत. त्याठिकाणी २५ ते ३० जण जखमी असल्याची प्राथमिक माहती आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयात त्यांना नेण्यात आलं आहे. अग्नीशमन दलाच्या गाड्यादेखील घटनास्थळी पोहोचल्या आहेत”, असे ते म्हणाले.

शंभूराज देसाई म्हणाले..

“या घटनेची माहिती मिळताच मी ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही आग कशाप्रकारे आटोक्यात आणता येईल, यासाठी संपूर्ण यंत्रणा कार्यरत आहे. ही घटना दुर्दैवी आहे. माझं या भागातील नागरिकांना आवाहन आहे, की कोणीही घाबरून जाऊ नये, ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे”, अशी प्रतिक्रिया ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

अंबादास दानवे काय म्हणाले?

“महाराष्ट्रात सातत्याने असे अपघात होत आहेत. आम्ही सातत्याने यासंदर्भात आवाज उठवला आहे. सरकारचे बॉयलरबाबतीतलं धोरण चुकीचं आहे. तसेच यासंदर्भातील सरकारचं खातं अकार्यक्षम आहे. औद्योगिक सुरक्षेबाबत सरकारकडून कमालीचं दुर्लक्ष केलं जात आहे. यात कामगारांचे प्राण जात आहेत, सरकारच्या दुर्लक्षामुळे अशा घटना घडत आहेत”, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी दिली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad reaction on dombivali midc blast in chemical company spb