Dahihandi 2025 : ठाणे : ठाण्याला दहीहंडीची पंढरी म्हटले जात असले तरी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या स्पर्धेला ग्लॅमर मिळवून दिले होते. त्यांची दहीहंडी पाहण्यासाठी विविध भागातून नागरिक एकत्र जमत असे. आव्हाड यांच्या दहीहंडीत अनेक विश्वविक्रम रचले गेले. इतकेच नाही तर स्पेनच्या गोविंदांना देखील त्यांनी पहिल्यांदाच भारतात आणले होते. परंतु काही वर्षांपूर्वी आव्हाड यांनी त्यांची दहीहंडी बंद केली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा कधीच दहीहंडी सुरु केली नाही. आव्हाड यांनी यावर्षी एक भावनिक पोस्ट केली आहे, या पोस्टमध्ये त्यांचे जुने व्हिडीओ, त्यांची अँकरिंग, गोविंदांसोबत नाचताना पाहायला मिळत आहे. यावेळी त्यांनी गोविंदाना उद्देशून वाक्ये ही लिहीली आहे.

राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते आमदार जितेंद्र आव्हाड हे ठाण्यात राहतात. ठाण्यातील पाचपाखाडी येथील ओपन हाऊस या ठिकाणी संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने आव्हाड हे दहीहंडीचे आयोजन करत. आव्हाड यांच्या दहीहंडीचे वैशिष्ट्य म्हणजे, ते स्वत: अँकरिंग करत, गोविंदांचा उत्साह वाढविण्यासाठी त्यांच्यामध्ये जाऊन मिसळत, त्यांच्यासोबत नाचत असे. त्यामुळे गोविंदा पथकांमध्ये त्यांच्या विषयी आपूलकी निर्माण झाली होती.

मुंबई, ठाण्यातील हजारो गोविंदा पथके त्यांच्या दहीहंडीच्या ठिकाणी मानवी मनोऱ्याचे थर रचण्यासाठी येतच असे. आव्हाड यांच्या व्यासपीठावर मोठ-मोठे कलाकार येऊ लागले, त्यामुळे दहीहंडीसाठी येणाऱ्या पथकांचा उत्साह शिगेला पोहचत असे. त्यांच्या दहीहंडीत ‘जय-जय महाराष्ट्र माझा’ गायले जात असे. हे गाणे गाताना अंगावर शहारा येत असे असे गोविंदा पथके सांगतात.

ठाण्यात विविध आयोजकांकडून दहीहंडी आयोजित केली जात होती. परंतु आव्हाड यांनी त्याला ग्लॅमर मिळवून दिले होते. १० वर्षांपूर्वी राज्य सरकारने दहीहंडीच्या थरावर काही निर्बंध लादले होते. तसेच, त्यावेळी दुष्काळही पडला होता. त्यामुळे आव्हाड यांनी दहीहंडी रद्द करण्याचे ठरविले होते. त्यानंतर आव्हाड यांनी पुन्हा दहीहंडी साजरीच केली नाही. यावर्षी आव्हाड यांनी एक भावनिक पोस्ट केली. आव्हाड यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावर एक पोस्ट टाकली आहे. त्यामध्ये ‘दहीहंडी उत्सव आठवण’ असे लिहीले आहे. त्यांच्या हंडीचा व्हिडीओ दाखविले आहे. त्यामध्ये आव्हाड हे अँकरिंग करताना, गोविंदांसोबत नाचताना पाहायला मिळतात. यानंतर आव्हाड यांनी त्यांच्या पोस्ट खाली हॅश टँग करत ‘मिस यु सो मच’,‘गोविंद’, ‘दहीहंडी’, ‘संघर्ष दहीहंडी’ असे म्हटले आहे. आव्हाड यांच्या पोस्टला अनेकांच्या काॅमेंटही मिळत आहेत.