कल्याण- येथील एका महिलेच्या घरात जाऊन तिच्या सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ४९ वर्षाच्या आरोपीला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयातील बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक विशेष न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश संगीता पहाडे यांनी सहा वर्ष ११ महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.


गोविंद जाधव असे आरोपीचे नाव आहे. अल्पवयीन मुलीचे कुटुंब आणि आरोपी जाधव हे शेजारी राहतात. घरात कोणी नसताना गोविंद याने आपल्या घरात येऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले, अशी तक्रार या मुलीच्या कुटुंबीयांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी गोविंद जाधव विरुध्द बालकांच्या लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याने (पाॅक्सो) गुन्हा दाखल केला होता.


या प्रकरणात आरोपी जाधवला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली होती. मे २०१५ पासून तो आधारवाडी येथील कारागृहात होता. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप सूर्यवंशी, उपनिरीक्षक एफ. एम. शेख यांनी तपास करून कल्याण न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. सात वर्ष या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू होत्या. सरकार पक्षातर्फे ॲड. अश्विनी भामरे, आरोपीतर्फे ॲड. आलिम शेख, ॲड. तृप्ती पाटील यांनी न्यायालयात बाजू मांडली. पोलीस-न्यायालय समन्वयकाची जबाबदारी हवालदार एस. जी. निकम यांनी पार पाडली. तपास, न्यायालयात कागदपत्र सादरीकरण हवालदार तेजश्री शिराळे, एकनाथ तायडे, सदानंद म्हात्रे यांनी केले.


आरोपी गोविंदवर प्राथमिक तपासणी अहवालात भारतीय दंड संहितेचे अनैसर्गिक अत्याचाराचे कलम तक्रारादारातर्फे लावण्यात आले होते. या प्रकरणात सबळ पुरावा उपलब्ध न झाल्याने न्यायालयाने आरोपीची या कलमातून निर्देोष मुक्तता केली, असे ॲड. तृप्ती पाटील यांनी सांगितले.