कल्याण : कल्याणमधील नामवंत बी. के. बिर्ला शाळेतील विद्यार्थी, शिक्षिकांसोबत सहलीस गेलेल्या एका शिक्षिकेचा तेथे अपघाती मृत्यू झाला आहे. या महिला शिक्षिकेच्या मृत्यूबद्दल विद्यार्थी, पालकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. सोमवारी या महिला शिक्षिकेचे पार्थिव कल्याण येथे आणले जाणार आहे.विश्वसनीय सुत्रांकडून मिळालेली माहिती, अशी की कल्याणमधील बी. के. बिर्ला शाळेतील शिक्षक, १६ विद्यार्थ्यांची सहल मौजमजेसाठी बाली येथे गेली होती.
एका पर्यटन कंपनीच्या माध्यमातून शाळेने या सहलीचे नियोजन केले होते. श्वेता पुष्कर पाठक असे अपघातात मरण पावलेल्या शिक्षिकेचे नाव आहे. या सहली सोबत बी. के. बिला शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना जांग्रा आणि इतर शिक्षक, श्वेता पाठक यांचे पतीही होते.
शनिवार रात्री बी. के. बिर्ला शाळेतील एका शिक्षिकेचे बाली येथे मृत्यू झाल्याची माहिती कल्याणमध्ये धडकली. स्थानिक पोलीस, शिक्षण संस्था याविषयी अनभिज्ञ होत्या. रात्री उशिरा श्वेता पाठक यांचा बाली येथे अपघाती मृत्यू झाल्याच्या माहितीला दुजोरा मिळाला. श्वेता पाठक या बी. के. बिर्ला शाळेतील समर्पित भावनेच्या आदर्श शिक्षक होत्या. हरहु्न्नरी स्वभावाच्या श्वेता पाठक या उपक्रमशील शिक्षिका म्हणून शाळेत ओळखल्या जात होत्या. शालेय अभ्यासक्रमा बरोबर विद्यार्थ्यांना अवांतर माहिती देऊन त्यांची घडण झाली पाहिजे यासाठी त्यांचे सतत प्रयत्न असत. विद्यार्थी, पालक यांच्यामधील महत्वाचा दुवा म्हणून त्या शाळेत काम करत होत्या. उत्तम प्रशिक्षक शिक्षक म्हणून शाळेत त्यांची ओळख होती. शाळेतील प्रत्येक विद्यार्थी आपल्या क्षमतेप्रमाणे विकसित झाला पाहिजे यासाठी त्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम हाती घेत, असे शाळेतील त्यांच्या समर्थक कर्मचाऱ्यांनी सांगितले.
श्वेता पाठक यांच्या अचानक जाण्याने शाळा व्यवस्थापन, पालक, विद्यार्थी यांना धक्का बसला आहे. विदेशात शालेय सहली नेताना सीबीएससी शाळेची नियमावली आहे. या नियमावलीप्रमाणे विदेशात पर्यटनासाठी विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना, त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात यावे. स्थानिक जिल्हा प्रशासन, स्थानिक यंत्रणेला यासंदर्भात अवगत करण्यात यावे. या नियमावलीचे पालन शाळेने केले होते की नाही याविषयी काही समजू शकले नाही. शाळा व्यवस्थापनाकडून यासंदर्भात प्रतिसाद मिळत नाही. शाळेचे विद्यार्थी शिक्षकांबरोबर पर्यटन कंपनीच्या साहाय्याने बाली येथे गेले आहेत. तेथे एका शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे. ही माहिती शाळेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. एवढीच माहिती व्यवस्थापनाकडून देण्यात येत आहे.