कल्याण – मुसळधार पावसामुळे उल्हास नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. या नदी काठी असलेले मोहिली येथील १०० दशलक्ष लीटर क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र आणि टिटवाळा येथील काळु नदीवरील साडे सात दशलक्ष लीटर क्षमतेचे उदंचन केंद्र पाण्याखाली गेल्याने ही दोन्ही केंद्रे रात्रीपासून पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने बंद केली आहेत.
उल्हास खोऱ्यातील भीमाशंकर, कर्जत, माथेरान, नेरळ परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाचे हे पाणी उल्हास नदीतून वाहत बदलापूर, कल्याण, डोंबिवली भागातून पुढे खाडीला जाऊन मिळते. उल्हास खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत रात्रीपासून वाढ होत आहे. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील मोहने येथील पाणी पुरवठा केंद्र येथे उल्हास नदीची पाणी पातळी मंगळवारी संध्याकाळपर्यंत ८.८० मीटर होती. ही पातळी बुधवारी सकाळी दहा वाजेपर्यंत ९.३४ मीटर झाली आहे. धोका पातळीच्या दिशेने उल्हास नदी मोहने येथे वाहत आहे.
हीच पातळी मोहिली उदंचन, जलशुध्दीकरण केंद्र येथे वाढल्याने नदी काठच्या मोहिली १०० दशलक्ष लीटर पाणी पुरवठा केंद्रात पाणी शिरले आहे. मोहिली येथे बुधवार सकाळची पाणी पातळी १०.३७ मीटर आहे. धोका पातळीच्या दिशेने उल्हास नदी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतून वाहत आहे.
मोहिली येथील उदंचन केंद्रातील मीटर क्युबिकमध्ये पाणी घुसले आहे. त्यामुळे पंप चालविणे शक्य नसल्याने रात्रीपासून मोहिली येथील १०० दशलक्ष लीटर उदंचन केंद्र बंद ठेवण्यात आले आहे. मोहिली येथील पाणी पुरवठा केंद्र बंद राहणार असल्याने कल्याण पश्चिमेतील काही भाग, ग्रामीणमधील काही भागांना होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. टिटवाळा येथील केंद्र बंद राहणार असल्याने टिटवाळा, मांडा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी परिसरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
मोहिली येथील १५० दशलक्ष लीटर क्षमतेच्या उदंचन केंद्रातून डोंबिवली पूर्व, पश्चिम शहराला पाणी पुरवठा केला जातो. उल्हास नदीला पूर आला की हे केंद्र पाण्याखाली जात होते. महावितरणची विद्युत यंत्रणा बंद पडत होती. त्यामुळे हा नेहमीचा त्रास टाळण्यासाठी मोहिली उदंचन केंद्रातील मीटर क्युबिकल यंत्रणा ठेकेदार संजय शहा यांनी चार वर्षापूर्वी पाणी पातळीपासून उन्नत ठिकाणी पाणी पुरवठा केंद्रात बसवून घेतली. तेव्हापासून उल्हास नदीचे पाणी मोहिली पाणी पुरवठा केंद्रात घुसले तरी डोंबिवली शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मोहिली उदंचन केंद्रावर कोणताही परिणाम होत नाही. या केंद्रातून नेतिवली येथील जलशुध्दीकरण केंद्रात पाणी आणून ते डोंबिवली शहराला पुरवठा केले जाते.
मोहिली पाणी पुरवठा केंद्रे उल्हास नदीच्या वेढ्यात अडकली की तेथील नियंत्रक कामगारांना बाहेर पडण्याच्या सूचना पालिकेकडून दिल्या जातात. या केंद्रात न जाता दूरसंवेदन यंत्रणेच्या साहाय्याने या केंद्रातील यंत्रणा चालू करण्याची, बंद करण्याची सुविधा पालिकेने कार्यान्वित केली आहे. पाण्याची पातळी ओसरली की मग ही केंद्रे पुन्हा सुरू केली जातात, असे या केंद्राचे देखभाल दुरुस्तीचे काम पाहणारे संजय शहा यांनी सांगितले.