कल्याण – कल्याण, डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा मंगळवार, १ जुलै रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी चार दरम्यान बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत महावितरणकडून विद्युत पुरवठा केल्या जाणाऱ्या टाटा पाॅवर कांबा उपकेंद्रातील एनआरसी – २ फिडरच्या देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.

या विद्युत उपकेंद्रातून कल्याण, डोंबिवली शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या नेतिवली, मोहिली येथील जलशुध्दीकरण केंद्रांना वीज पुरवठा केला जातो. हे दुरुस्तीचे काम सात तास केले जाणार आहे. त्यामुळे नेतिवली, मोहिली येथील जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी पुरवठा होणाऱ्या कल्याण ग्रामीण भागातील मांडा, टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी, मोहने आणि परिसरातील गावे, कल्याण पश्चिमेतील ब प्रभाग हद्दीतील मिलिंदनगर, योगीधाम, चिकनघर, बिर्ला महाविद्यालय परिसर, म्हाडा वसाहत, मुरबाड रस्ता परिसर, डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

कल्याण डोंबिवली पालिकेच्या १५० दशलक्ष लीटर मोहिली उदंचन केंद्र आणि मोहिली येथील १०० दशलक्ष लीटर जलशुद्धीकरण केंद्राला महावितरणकडून पाणी पुरवठा केला जातो. हा विद्युत पुरवठा टाटा पाॅवरच्या कांबा येथील उपकेंद्रातून केला जातो. या उपकेंद्राच्या एनआरसी-२ फिडरमध्ये दुरुस्ती करावयाची असल्याने या दोन्ही जलशुध्दीरकरण केंद्रांचा पाणी पुरवठा पालिकेकडून बंद ठेवण्यात येणार आहे. तसे पत्र महावितरणकडून पालिकेला देण्यात आले आहे. मागील दोन ते तीन महिन्याच्या काळात टाटा पाॅवरच्या कांबा येथील उपकेंद्रात दोन वेळा देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत. त्यावेळीही पालिकेचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता.

मंगळवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणी साठा करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.