कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील २८० महापालिका, खासगी शाळांमधील ६३ हजार इयत्ता पहिली ते दहावीमधील विद्यार्थ्यांना जूनमध्ये शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी क्रमिक अभ्यासक्रमांची पुस्तके देण्याचे नियोजन शासनाच्या सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने केले आहे, अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिका शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी दिली.

जूनमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेच्या पहिल्या दिवशी आपल्याकडे आपण शिक्षण घेणाऱ्या इयत्तेचे पुस्तक असावे असे वाटते. ही पुस्तके वेळेत मिळाली नाही की मग विद्यार्थी आपल्या पालकांना पुस्तकांसाठी तगादा लावतात. हे प्रकार टाळण्यासाठी शासनाच्या सर्व शिक्षा अभियानातून कल्याण डोंबिवली पालिकेकडे तीन लाख ७० हजार पुस्तके दाखल झाली आहेत. ही पुस्तके इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत.

ही पुस्तके पालिका हद्दीतील २८० शाळांमध्ये पोहचविण्यासाठी २१ समूह साधन केंद्रे तयार करण्यात आली आहेत. ही केंद्रे विविध भागात आहेत. या केंद्राच्या माध्यमातून त्या भागातील शाळांना पुस्तकांचे वाटप केले जाणार आहे. आपल्या शाळेत किती विद्यार्थी आहेत. याची सविस्तर माहिती यापूर्वीच शाळांनी ऑनलाईन माध्यमातून शासनाकडे जमा केली आहे. त्या मागणीप्रमाणे ही पुस्तके दाखल झाली आहेत, असे उपायुक्त संजय जाधव यांनी सांगितले. ही पुस्तके ताब्यात घेण्यासाठी प्रत्येक पालिका, खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांना कळविण्यात आले आहे. शाळा सुरू होण्यास आता पंधरा दिवस शिल्लक आहेत. या कालावधीत पुस्तके शाळांमध्ये पोहचविण्याची व्यवस्था होईल. शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे मोफत संच विद्यार्थ्यांना देण्यात येतील, असे उपायुक्त जाधव यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे पालिका नियंत्रित शालेय, बालवाडी विद्यार्थ्यांना गणवेश , दप्तर, चप्पल, रेनकोट, शालेय वह्या व बालवाडी लेखन साहित्य जून अखेरपर्यंत देण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने केले आहे. गणवेशासंदर्भातची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दप्तर, चपला, रेनकोट पालकांनी खरेदी करून त्याची पावती पालिका शिक्षण विभागाकडे दाखल केली की त्याप्रमाणे पालकांना त्याची रक्कम अदा केली जाणार आहे. एकही विद्यार्थी शालेय साधनांपासून वंचित राहणार नाही याची विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. शाळा सुरू झाल्यानंतर शालेय साहित्य विद्यार्थ्यांना वेळेत मिळावे म्हणून शाळा सुरू होण्याच्या पंधरा दिवस अगोदर हे नियोजन करण्यात आले आहे, असे उपायुक्त जाधव यांनी सांगितले.