कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील दोन नाल्यांमधून प्रक्रिया न करता पालिकेकडून थेट उल्हास नदीत पाणी सोडले जात आहे. त्यामुळे उल्हास नदीचे पाणी प्रदुषित होत आहे. असा ठपका ठेवत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण शाखेने कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.पालिका हद्दीतील दोन नाल्यांमधून उल्हास नदीत विना प्रक्रिया सोडण्यात येणारे सांडपाणी तात्काळ बंद करावे. यासाठी प्रभावी उपाय योजना कराव्यात, असे नोटिसीत सूचित करण्यात आले आहे.
कल्याण, डोंबिवली शहरांच्या विविध भागातील बावीस ठिकाणाहून प्रक्रिया न करता सांडपाणी थेट उल्हास नदीत सोडण्यात येत असल्याचे यापूर्वी निष्पन्न झाले आहे. उल्हास नदीत वाहणारे हे नाले बंद करण्यासाठी चार वर्षापूर्वी कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने प्रभावी उपाययोजना करण्याचे नियोजन केले होते. अर्थसंकल्पात तशी तरतूद करण्यात आली होती. त्याची नंतर प्रभावी अंमलबजावणी प्रशासनाकडून झाली नसल्याचे समजते.
उल्हास नदी पात्रात नदी काठच्या विविध महापालिका हद्दीतून सांडपाणी, औद्योगिक घातक प्रक्रिया पाणी विना प्रक्रिया नदीत सोडले जाते. त्यामुळे नदीतील पाणी प्रदुषित होते. जल प्रदुषणामुळे नदीतील जलपर्णीचा धोका वाढत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने उल्हास नदी पात्रात विना प्रक्रिया सांडपाणी सोडणाऱ्या नदी काठच्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर कारवाईसाठी पाऊल उचलले आहे.
उल्हास नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी मागील काही वर्षापासून कल्याण मधील पर्यावरणप्रेमी नितीन निकम, श्रीनिवास घाणेकर, उमेश बोरगावकर नदी पात्रात आंदोलन करत आहेत. या आंदोलनाची प्रदूषण नियंत्रण मंडळासह पालिका, शासनाने गंंभीर दखल घेतली आहे. या आंदोलनामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने उल्हास नदीतील जलपर्णी यांत्रिक पध्दतीने काढण्याचे काम सुरू केले आहे.
उल्हास नदीत नाल्यातून सांडपाणी सोडताना कोणत्या प्रक्रिया केल्या जात आहेत किंवा केल्या जाणार आहेत, याविषयीची माहिती घेऊन पालिका प्रशासनाला यासंदर्भात योग्य उपाययोजनेसाठी, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी जयवंत हजारे यांनी सांगितले.
उल्हास नदी काठच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायतींकडून उल्हास नदीत थेट प्रक्रिया न करता घातक सांडपाणी सोडले जात आहे. त्याचा मंडळाकडून शोध घेतला जात आहे. यासंदर्भात संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना मार्गदर्शन केले जाणार आहे. उल्हास नदी स्वच्छतेचा एक परिपूर्ण अहवाल प्रस्तावित आहे. जयवंत हजारे प्रदूषण नियंत्रण अधिकारी.
उल्हास नदीत सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याविषयी प्रशासन प्रभावी उपाय योजना करत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांचेही यासंदर्भात मार्गदर्शन घेण्यात येईल. मंडळाकडून पाठविण्यात आलेल्या नोटिशीला योग्य उत्तर दिले जाईल. घनश्याम नवांगुळ कार्यकारी अभियंता, जल, मलनिस्सारण विभाग.
उल्हास नदी प्रदूषण मुक्त होईपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही. या नदी काठच्या महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी एकत्रितपणे विचार करून उल्हास नदी स्वच्छ आणि प्रदूषण मुक्तीसाठी कायमस्वरुपी उपाययोजना कराव्यात. नितीन निकम पर्यावरणप्रेमी