कल्याण – कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील गेल्या पाच वर्षापासून सुरू असलेल्या रेल्वे स्थानक वाहतूक सुधारणा (सॅटिस) प्रकल्पाचा काही भाग येत्या जानेवारीपर्यंत सुरू झाला पाहिजे, अशा आयुक्त अभिनव गोयल यांच्या सूचना आहेत. त्यामुळे या भागातील उड्डाण पुलावरील तुळया ठेवण्याची कामे गतिमानतेने सुरू करण्यात आली आहेत.
कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात दिवसा रिक्षा, प्रवाशांची वर्दळ असते. या वर्दळीमुळे या भागात दिवसा तुळया ठेवण्याची कामे ठेकेदार कंपनीला करता येत नाही. ही कामे रात्री अकरा ते पहाटे चार वेळेत केली जातात. दोन आठवड्यापूर्वी आयुक्त गोयल यांनी दोन तास सॅटिस प्रकल्पाची या प्रकल्पाच्या नियंत्रक कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, ठेकेदार कंपनीचे अभियंते यांच्यासह पाहणी केली होती. या पाहणीच्यावेळी आपल्या अभियंता नजरेतून असलेल्या काही त्रृटी, उर्वरित कामे गतिमानतेने पूर्ण करण्याच्या सूचना केल्या होत्या.
या आदेशाप्रमाणे रेल्वे स्थानकाजवळील उड्डाण पुलावरील तुळया ठेवण्याची कामे ठेकेदार कंपनीने सुरू केली आहेत. कल्याण न्यायालयाजवळील डाॅ. आंबेडकर उद्यानासमोरील पुलाच्या खांबांवर तुळया ठेवण्याचे काम आव्हानात्मक होते. हे काम गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास आयुक्त अभिनव गोयल, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, उपअभियंता संदीप तांबे, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराचे अभियंते यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी टनाच्या वजनाच्या तुळया ठेवण्यासाठी अवजड शक्तिमान यंत्रणा उभी करण्यात आली होती.
हे आव्हानात्मक काम करताना कोणतीही त्रृटी राहू नये. आयुक्त स्वता उत्तम अभियंता असल्याने ते स्वता तुळया ठेवण्याच्या कामाच्या वेळी उपस्थित होते. सन २०२१ मध्ये हा प्रकल्प सुरू झाला आहे. या कामाची मुदत सन २०२३ पर्यंत होती. या प्रकल्पाच्या मार्गात भूसंपादन, रहिवाशांचे पुनर्वसन, काही न्यायालयीन प्रकरणे होती. ही प्रकरणे मार्गी लावण्यासाठी कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी प्रयत्न केले. आता हे बहुतांशी प्रश्न मार्गी लागल्याने सॅटिस प्रकल्पाच्या कामाने आता गती घेतली आहे.
या कामासाठी शासनाने ४९८ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. बस स्थानकाच्या भागात एकाच ठिकाणी बस थांबा, रिक्षा वाहनतळ, खासगी मोटार वाहनतळ, रेल्वे स्थानक ते एस. टी. बस आगाराला जोडणारी एकसंध मार्गिका असणार आहे. मुरबाड रस्त्यावरील सुभाष चौक ते बैलबाजार दरम्यान १६३० मीटरचा उड्डाण पूल असणार आहे. या पुलामुळे पत्रीपुलाकडून मुरबाड रस्त्याने जाणारी वाहने कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकातील वाहतुकीला अडथळा न आणता थेट परस्पर दिशेने धावणार आहेत. या पुलाची बहुतांशी कामे पूर्ण झाली आहेत.
