कल्याण – चित्रपटातील पाठलागाच्या थरारकाप्रमाणे कल्याण मधील कोळसेवाडी वाहतूक विभागाच्या दोन हवालदारांनी चपळाईने दुचाकीवरून पळून जात असलेल्या एका गांंजा तस्कराचा वाहनातून पाठलाग केला. त्याला कल्याण पूर्वेतील सूचकनाका येथे अडवून वाहतूक पोलिसांनी गांजासह इतर अंमली पदार्थ जप्त केले.
कोळसेवाडी वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक राजेश भाबल, हवालदार विनोद बच्छाव अशी कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. भावेश इंद्रजित राऊळ (२२) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव आहे. तो ठाण्या जवळील कळवा विटावा भागात गजानन नगर, बंदरपाडा रस्ता रामा सोसायटी परिसरात राहतो. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे हवालदार प्रदीप गिते यांच्या तक्रारीवरून भावेशवर अंमली पदार्थ प्रतिबंध कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त किरण बालवडकर यांनी सांगितले, बुधवारी (ता.१) सकाळी अकरा वाजता कोळसेवाडी वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक राजेश भाबल, हवालदार विनोद बच्छाव हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रीपूल भागात वाहतूक नियोजनाचे काम करत होते. यावेळी त्यांच्या समोरून भरधाव वेगात एक दुचाकी स्वार चालला होता. त्याच्या दुचाकीवर वाहन क्रमांक नव्हता. त्या दुचाकी स्वाराच्या पाठीमागे काही तरूण त्या दुचाकी स्वाराला पकडा असे मोठ्याने ओरडत होते. त्याने बैलबाजार भागात एक व्यक्तिवर शस्त्राने वार केले आहेत, असे सांगत दुचाकी स्वाराच्या पाठीमागे धावत होते.
एका तरूणाने पोलीस उपनिरीक्षक भाबल, हवालदार बच्छाव यांना इशारा करत, साहेब त्या दुचाकी स्वाराला पकडा, असे सांगताच क्षणाचाही विलंब न लावता भाबल यांनी दुचाकी स्वाराला इशारा करून थांबविण्याचा प्रयत्न केला. त्याने भाबल, बच्छाव यांना वळण देऊन वेगाने दुचाकी पुढे नेली. दुचाकी स्वार थांबत नाही पाहून उपनिरीक्षक भाबल, बच्छाव यांनी एक खासगी वाहन घेऊन मेट्रो माॅलच्या दिशेने भरधाव वेगात असलेल्या दुचाकी स्वाराचा पाठलाग सुरू केला.
दुचाकी स्वाराला भाबल यांनी सूचकनाका भागात आपले वाहन आडवे टाकून रोखले. तरीही तो दुचाकी स्वार पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. उपनिरीक्षक भाबल, बच्छाव यांनी विचारल्याप्रमाणे त्या तरूणाने आपले नाव भावेश इंद्रजित राऊळ (२२) असल्याचे आणि आपण कळवा विटावा भागात राहतो असे सांगितले. वाहतूक पोलिसांनी भावेश राऊळला दुचाकीवर वाहन पट्टी का नाही म्हणून प्रश्न केला. तो निरूत्तर झाला. एवढ्या वेगात का पळत होतास, त्याचेही उत्तर तो देऊ शकला नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांचा संशय बळावला.
पोलिसांनी या तरूणाच्या दुचाकीची पेटी तपासली. त्यामध्ये अंमली पदार्थ सदृश्य पदार्थ, औषध दुकानातील गोळ्या असा साठा आढळून आला. या तरूणाने गांजा सेवन केला असल्याचा संशय आल्याने उपनिरीक्षक भाबल, हवालदार बच्छाव यांनी या तरूणाला कोळसेवाडी पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्याच्यावर गुन्हा दाखल करून समजदारीची नोटीस देऊन त्याला सोडण्यात आले. हवालदार सौदाने याप्रकरणाचा तपास करत आहेत.