बदलापूर: गुणी लोकप्रतिनिधींच्या मागे उभे राहणे माझे काम आहे. तसेच ज्यांच्यात धमक असते ते कधीही माजी होत नाहीत. कपिल पाटील हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, ते जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले, खासदार झाले केंद्रीय मंत्री झाले. भविष्यातही ते पुन्हा खासदार आणि केंद्रीय मंत्री होतील. तसेच शिवसेनेचे वामन म्हात्रे हे बदलापूरचे महापौर होतील, असे भाकीत राज्याचे नवनियुक्त वनमंत्री गणेश नाईक यांनी केले आहे. भाजपचे कोकण शिक्षण मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त नाईक बदलापूर शहरात आले होते. त्यानिमित्त नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही भाकित केली. गेल्या काही महिन्यात बदलापुरात शिवसेना विरुद्ध भाजपचे काही नेते तसेच भाजप विरुद्ध भाजप नेते असा वाद सुरू आहे. त्यात नाईक यांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपाचे कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्ताने महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील शाळांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर गुणवंत कर्मचाऱ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत बदलापूर येथे झालेल्या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील हेदेखील उपस्थित होते. यावेळी दोघांनी आमदार म्हात्रे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी दोन्ही नेत्यांनी म्हात्रे बंधूंवर स्तुती सुमाने उधळली. वनमंत्री गणेश नाईक यांनी माध्यमांशी बोलताना आपण वामन म्हात्रे आणि कपिल पाटील यांच्या पाठीशी उभे आहोत असे स्पष्ट केले. गुणी व्यक्तींच्या मागे उभे राहणे माझे काम आहे असे सांगत नाईक यांनी वामन म्हात्रे आणि कपिल पाटील यांचे समर्थन केले. तसेच कपिल पाटील भविष्यात पुन्हा खासदार आणि केंद्रात मंत्री होतील अशी ही आशा त्यांनी व्यक्त केली. सोबतच बदलापूर महापालिका झाल्यानंतर वामन म्हात्रे त्याचे महापौर होतील असाही दावा नाईक यांनी केला. गणेश नाईक यांच्या या वक्तव्यानंतर बदलापुरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा – राज्याबाहेर एक जरी उद्योग गेला तर मी तुमची काळजी घेईन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्योग मंत्र्यांना इशारा

हेही वाचा – सराफाच्या दुकानातील कामागाराची हत्या करणाऱ्यास उत्तरप्रदेशातून अटक, दोन आरोपींचा शोध सुरू

गेल्या काही महिन्यात बदलापूर आणि मुरबाड विधानसभा तसेच भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये अनेक राजकीय संघर्ष उभे राहिले आहेत. लोकसभेपासून माजी खासदार कपिल पाटील आणि मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्यात संघर्ष सुरू आहे. पराभवानंतर कपिल पाटील कथोरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. तर कथोरे यांनीही विधानसभेच्या विजयानंतर आपण आता माजी लोकप्रतिनिधींना आजी होऊ देणार नाही असे जाहीर केले होते. तर शिवसेनेचे वामन म्हात्रे यांनाही कथोरे यांनी इशारा दिला होता. त्यानंतर विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने कपिल पाटील आणि वामन म्हात्रे एकत्र आल्याचे चित्र दिसते आहे. त्यातच शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे वनमंत्री गणेश नाईक उपस्थित होते. त्यांनीही आपण म्हात्रे आणि पाटील यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केल्याने आता हा स्थानिक संघर्ष कोणत्या दिशेला जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kapil patil minister again vaman mhatre will be the mayor forecast by forest minister ganesh naik ssb