खरे तर समाजात असे अनेक लोक आहेत की, ज्यांना सामाजिक काम करायचे आहे अथवा सामाजिक संस्थांना मदत करायची आहे. तथापि नेमके काय काम करायचे आणि कोणत्या संस्थेला मदत करायची या गोंधळात अशा लोकांकडून कोणतेही ठोस काम होताना दिसत नाही. वस्तुत: आपल्या घरातील कामवाल्या बाईच्या मुलांना आपलेपणाने शिकवणे, त्यांच्या शिक्षणाचा भार उचलण्यापासून समाजात डोळसपणे पाहिले तर अनेक कामे सहज करता येऊ शकतात. त्यातही बहुविकलांग मुलांचे प्रश्न हे एक वेगळेच आव्हान म्हणावे लागेल. अशा मुलांच्या पालकांसमोरील प्रश्न फार मोठे असतात. दुर्दैवाने शासन अथवा समाजातील दानशूर लोकांनी या प्रश्नाकडे कधी गांभीर्याने पाहिलेले नाही.

दर हजार मुलांमागे चार मुले ही बहुविकलांग म्हणजे सेरेब्रल पाल्सी म्हणजे ज्याला मेंदूचा पक्षाघात म्हणतो अशी जन्माला येतात. अंध तसेच या बहुविकलांग मुलांचा सांभाळ करणे हे अतिशय अवघड काम आहे. ठाण्यातील नीता देवळालकर यांनी हे आव्हान पेलले. खरे तर ही त्यांच्या घरातील समस्या. त्यांची कन्या ‘सेरेब्रल पाल्सी’चा आजार असलेली. आपल्या मुलीवर उपचार करताना जी जीवघेणी धावपळ करावी लागत होती ते पाहून अशा अन्य पालकांची त्यातही ज्यांची आर्थिक स्थिती यथातथा असेल त्यांची काय अवस्था होत असेल असा विचार करून नीता देवळालकर यांनी एकाच ठिकाणी या आजारावरील उपचाराची व्यवस्था व्हावी असा विचार करून ‘स्वयम्’ ही संस्था काढली. खरे तर स्वत:पुढे अडचणींचा डोंगर उभा असताना समाजाचा विचार करण्याची बुद्धी बाळगणे ही एक आगळीच सामाजिक बांधीलकी मानावी लागेल. अनाथ मुलांना, गरीब मुलांना, रस्त्यावरील मुलांना शिकविणाऱ्या अथवा त्यांच्यासाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत. तथापि बहुविकलांग मुलांसाठी काम करणाऱ्या संस्था अथवा व्यक्ती या अभावानेच आढळतात. त्यातही पक्षाघाताने पीडित मुलांचा अठरा वर्षांनंतर सांभाळ करण्यास अपवादानेच काही संस्था काम करतात. नीता देवळालकर यांनी या मुलांवर केवळ उपचार करण्यापुरते मर्यादित उद्दिष्ट न ठेवता या मुलांच्या जीवनात अन्य सामान्य मुलांसारखा आनंद मिळावा यासाठी अनेक उपक्रम आखले आहेत. त्यांच्याकडे अनेक योजना तयार आहेत. अठरा वर्षांवरील मुलांना सांभाळण्याचे कामही काही प्रमाणात ‘स्वयम्’कडून केले जात असले तरी महापालिका अथवा राज्य शासनाने अशा मुलांसाठी वसतिगृह बांधून ठोस आर्थिक मदत दिल्यास अशा वसतिगृहाची जबाबदारीही सांभाळण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे. प्रत्येक आई-वडिलांना आपले बाळ सुंदर व निरोगी जन्मावे असे वाटत असते. दुर्दैवाने हे भाग्य काहींच्या वाटय़ाला येत नाही. या साऱ्याचा विचार करून २००५ नीता व राजीव देवळालकर यांनी अशा मुलांच्या पालकांची एक चळवळ उभी केली. ‘स्वयम्’ म्हणजे स्वत:च्या पायावर उभे राहण्याची. एकाच ठिकाणी विविध थेपरी मिळतील यासाठी त्यांनी अथक प्रयत्न के ले. या बहुविकलांग मुलांना ऑक्युपेशनल, सेन्सर इंटिग्रेशन, न्युरो डेव्हलपमेंट, स्पीच थेरपी, ग्रुप थेरपीसह अनेक विशेष उपचारांची आवश्यकता असते. ही गरज ओळखून नीता यांनी एकाच ठिकाणी पालकांसाठी ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर संस्था उभी केली. त्यामुळे अशा मुलांसाठी व पालकांसाठी ‘स्वयम्’ एक मोठा आधार ठरली. सुरुवातीला संस्थेचे कार्यालय ठाण्यातील तीन पेट्रोल पंप येथील श्रीकृपा इमारतीतील छोटय़ा जागेत सुरूझाले. २००६ मध्ये संस्था खऱ्या अर्थाने जन्माला आली आणि गेल्या दशकभरात संस्थेचा पसारा चांगलाच वाढला. आतापर्यंत सुमारे ४०० मुलांनी या संस्थेचा लाभ घेतला असून संस्थेचे काम पाहून ठाणे महापालिकेने त्यांना कौशल्य हॉस्पिटल येथील तळमजल्यावरील सुमारे सव्वादोन हजार चौरस फुटांची जागा २०१४ मध्ये दिली.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी संस्थेला वेळोवेळी मदतीचा हात दिल्याचे नीता देवळालकर यांनी आवर्जून सांगितले. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी व ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही संस्थेला प्रायोगिक तत्त्वावर एक वर्षांसाठी २३ लाख रुपयांची मदत उपलब्ध करून दिली.
सध्या या संस्थेत ७० बहुविकलांग मुले नियमित स्वरूपात येतात तर वीस मुले दिवसभरासाठी येथे असतात. त्यांसाठी वेगवेगळे थेरपिस्ट, आया व अन्य कर्मचारी कार्यरत असून ही सर्व मंडळी अत्यंत प्रेमाने मुलांची काळजी घेत असतात असे नीता यांनी सांगितले. केवळ उपचारापुरते मर्यादित न राहता या मुलांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करण्यासाठी अनेक योजना आखण्यात आल्या आहेत. या मुलांसाठी सहली आयोजित केल्या जातात. तसेच वेशभूषा, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच दिवाळीसारखे सण मोठय़ा प्रमाणात साजरे केले जातात. अठरा वर्षांवरील मुलांसाठी व्यवसाय शिक्षणाच्या कार्यशाळांचे आयोजन केले जाते. ठाणे परिसरातील तसेच जिल्ह्य़ातील अनेक मुले याचा लाभ घेतात. अनेक पालकांना काही कारणांमुळे आपल्या मुलांना संस्थेत आणणे शक्य होत नाही. अशा बहुविकलांग मुलांसाठी होम बेस पुनर्वसन सेवेची सुरुवात गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून सुरू केली आहे. विशेष म्हणजे ‘स्वयम्’मध्ये सर्व मुलांवर विनामूल्य उपचार केले जातात. अर्थात ज्यांना वैयक्तिक थेरपी घ्यायची असते, त्यांना थेरपिस्टना काही रक्कम द्यावी लागते. मात्र खासगी ठिकाणी जिथे एका सिटिंगसाठी सहाशे ते आठशे रुपये लागतात तिथे संस्थेत मात्र यासाठी फक्त तीनशे रुपये घेतले जातात. बाहेर खासगी संस्थेत अशा मुलांना सांभाळणे व वेगवेगळ्या थेरपी देण्यासाठी किमान दहा हजार रुपये महिन्याकाठी खर्च येत असतो. मात्र ‘स्वयम्’मध्ये ग्रुप थेरपी व डेकेअरसाठी एक पैसाही घेतला जात नाही. सध्या संस्थेचा वार्षिक खर्च सुमारे २५ लाखांच्या घरात असून दानशूर व्यक्तींनी दिलेल्या देणग्यांवर संस्थेचे कामकाज चालते. अवधुत गुप्ते यांनी संस्थेला तीन लाख रुपयांची मदत तर केलीच शिवाय या मुलांसाठी गाण्याचे कार्यक्रमही केले. अवधुत गुप्तेंमुळेच स्वप्निल बांदडोकर, बेला शेंडे, कौशल इनामदार, मिलिंद इंगळे यांच्यासारख्या कलाकारांनी कार्यक्रम केल्याचे नीता देवळालकर यांनी सांगितले. एका मुलीने आपला पहिला पगार दिला तर एक वकील दर वर्षी ठरावीक रक्कम मदत म्हणून देतो. ‘सीएसआर’अंतर्गत काही कंपन्यांनी मदत दिली. मात्र सीएसआरचा एकूण अनुभव निराशाजनक म्हणावा लागेल. बहुविकलांगांना मदत केल्यामुळे आपल्याला फायदा काय, असा विचार करणारेच जास्त असल्यामुळे अशा मुलांसाठी संस्था चालवणे हे अत्यंत अवघड काम आहे. सामाजिक जाणीव बाळगून अशा संस्थांना मदत करण्यासाठी लोकांनी मोठय़ा प्रमाणात पुढे येण्याची गरज आहे.
कौशल्य मोडिकल फाऊंडेशन, तळमजला, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम,
नीता देवळालकर-९८६७३५५५३५