डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील फ प्रभाग हद्दीत ठाकुर्ली, ९० फुटी रस्ता, शेलार नाका, पाथर्ली, छत्रपती शिवाजी महाराज चौक (घरडा सर्कल) भागातील वर्दळीच्या रस्त्यांवर लावण्यात आलेले धोकादायक होर्डिंग्ज पालिकेच्या फ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी तोडकाम पथकाच्या साहाय्याने काढून टाकले.

मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर असलेल्या या होर्डिंग्जना धारकांनी पालिकेच्या मालमत्ता विभागाची परवानगी घेतली नसल्याचे पालिका कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. हे होर्डिंग्ज ९० फुटी रस्त्यावर कचोरेपर्यंत रस्त्याच्या दर्शनी भागात लोखंडी सांगाडे तयार करून लावण्यात आले होते. काही होर्डिंग्जचे सांगाडे लाकडी पट्ट्यांचे तयार करण्यात आले होते. वारा, वादळी पाऊस सुरू झाला की हे होर्डिंग्ज त्यांंना कोणताही आधार नसल्याने जोराने हलत असल्याचे आणि ते कोसळण्याची शक्यता असल्याच्या तक्रारी फ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्याकडे आल्या होत्या.

होर्डिंग्ज कोसळून दुर्घटना घडू नये म्हणून साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांच्या आदेशावरून अधीक्षक चौधरी, वरिष्ठ लिपिक शिरीष भोईर आणि अतिक्रमण नियंत्रण पथकाने फ प्रभाग हद्दीतील पालिकेच्या परवानग्या नसलेल्या आणि धोकादायक स्थितीत मुख्य, अंतर्गत रस्त्यांवर लावण्यात आलेल्या होर्डिंग्जची पाहणी केली. या पाहणीत शेलार नाका, ९० फुटी रस्ता, पाथर्ली, कचोरे भाग, चोळेगाव भागात १० हून अधिक पालिकेच्या परवानग्या न घेता मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर होर्डिंग्ज लावली असल्याचे पालिकेच्या पाहणी पथकाच्या निदर्शनास आले.

पालिका हद्दीतील रस्ते दिवस रात्र पादचारी, वाहनांच्या वर्दळीने सुरू असतात. त्यामुळे होर्डिंग्ज कोसळून अपघात होऊ नये म्हणून साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी तोडकाम पथक, वेल्डिंग कारागिर घेऊन फ प्रभागातील होर्डिंग्ज तोडण्याची आणि त्यांचे लोखंडी सांगडे कापण्याची मोहीम सुरू केली. दिवसभरात प्रभागातील दहाहून अधिक लोखंडी आणि लाकडी सांगाड्याचे धोकादायक होर्डिंग्ज काढून टाकण्यात आले. होर्डिंग्जवर कारवाई सुरू असताना कोणीही धारक कारवाई रोखण्यासाठी पुढे आला नाही. बहुतंशी होर्डिंग्ज राजकीय आशीर्वादाने उभारण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.