मालमत्ता कर वसूल करा, तरच वेतन मिळणार आयुक्तांची तंबी
कल्याण – आगामी महापालिका निवडणुका, या निवडणुकांची आचारसंहिता. त्यामुळे निवडणूक कामे करताना मालमत्ता कराची वसुली कशी करणार. आतापर्यंत मालमत्ता कराची लक्ष्यांकापेक्षा एकदमच कमी वसुली झाली आहे. हे अजिबात सहन केले जाणार नाही. मला तुम्ही हलक्यात घेऊ नका, अशी तंबी देत कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी शुक्रवारी मालमत्ता कर विभागाच्या वरिष्ठांपासून ते कर वसुली कर्मचाऱ्यांना पालिका मुख्यालयातील बैठकीत फैलावर घेतले.
मालमत्ता कराची पूर्ण क्षमतेने वसुली करा, वसुली नाही तर मग वेतनाची पण अपेक्षा करू नका, अशा इशारा आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना दिला.
आयुक्त गोयल यांचे रौद्ररूप पाहून उपस्थित अधिकारी, कर्मचारी थरथरा लटलट कंप पावत आयुक्तांच्या प्रश्नांना उत्तरे देत होते. साडे तीन तास ही बैठक सुरू होती. चालू आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर वुसलीचा लक्ष्यांक ६०० कोटी आहे. चालू आर्थिक वर्षाचे आठ महिने निघून गेले आहेत. या कालावधीत वसुलीचा लक्ष्यांक विचार करून मालमत्ता कर विभागाने निम्म्याहून अधिक कर वसुली करणे अपेक्षित होते, असे आयुक्तांचे मत होते. प्रत्यक्षात चाळीस टक्केच वसुली झाल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. मालमत्ता कर वसुलीबाबत मालमत्ता कर विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड, त्यांचे साहाय्यक आयुक्त, दहा प्रभागांमधील साहाय्यक आयुक्त, मालमत्ता कर अधीक्षक अजिबात गंभीर नाहीत, हे निदर्शनास आल्यावर आयुक्त संतप्त झाले.
मालमत्ता कर वसुली अतिशय संथगतीने सुरू असल्याचे आणि अशीच वसुली होत असेल तर आपण लक्ष्यांक पूर्ण करू शकणार नाहीत, असे आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणले.
साहाय्यक आयुक्तांना घाम
आक्रमक पवित्रा घेत आपण मला हलक्यात घेता काय, असे बोलून आयुक्त गोयल यांनी क प्रभागाचे साहाय्यक आयुक्त धनंजय थोरात, अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी, कल्याण पूर्व आय प्रभागाचे चंद्रकांत जगताप, ई प्रभागाचे साहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे यांना मालमत्ता कर वसुलीवरून फैलावर घेतले. यामध्ये क प्रभागाचे थोरात, आय प्रभागाचे जगताप आणि ई प्रभागाचे तामखेडे यांची आयुक्तांनी कर वसुलीतील निष्क्रिय कामगिरीवरून कल्हई केली.
ई आणि आय प्रभागातील कर वसुलीवरून आयुक्तांनी संताप व्यक्त करत, येत्या काही दिवसात या दोन्ही विभागातून मालमत्ता कराची अपेक्षित वसुली दिसली नाही तर मग तुम्हाला पगारही मिळणार नाही अशी तंबी दिली. तुम्हाला पदोन्नत्या मिळाल्या असतील तर मग पदस्थापना कशी मिळते याचाही विचार केला जाईल, असा इशारा कर्मचाऱ्यांना दिला. आयुक्तांचे रौद्ररूप पाहून कर्मचाऱ्यांची गाळण उडाली होती.
डिसेंबरपर्यंत वसुली करा
आगामी पालिकेच्या निवडणुकांचा विचार करून डिसेंबर म्हणजे मार्च अखेर आहे असे समजून मालमत्ता कराचा वसुली लक्ष्यांक पूर्ण करण्यासाठी कामाला लागा. लक्ष्यांकाप्रमाणे मालमत्ता कर वसुली विहित वेळेत झाली नाहीतर मग मात्र कोणालाही सोडणार नाही, अशी तंबी आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना दिली.
