कल्याण : टिटवाळा अ प्रभाग हद्दीतील मानिवली गाव हद्दीत भूमाफियांनी रस्ता अडवून बेकायदा चाळी उभारल्या होत्या. या बेकायदा चाळींची माहिती मिळताच अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी तोडकाम पथकाच्या साहाय्याने भर पावसात उभारलेल्या दोन चाळी जमीनदोस्त केल्या.

टिटवाळा परिसरातील बल्याणी, बनेली, वासुंद्री रस्त्यावरील बेकायदा चाळी गेल्या महिनाभरात अ प्रभागाच्या तोडकाम पथकाने जमीनदोस्त केल्या आहेत. मानविली गावात भूमाफियांंनी गावातील रस्त्याला अडथळा येईल अशा पध्दतीने बेकायदा चाळींची उभारणी केली. याविषयी उघडपणे तक्रार केली तर भूमाफियांकडून त्रास होईल, या भीतीने ग्रामस्थ या बेकायदा बांधकामा विषयी पालिकेत तक्रार करण्यास पुढाकार घेत नव्हते.

या बेकायदा चाळी उभारून घाईने त्यात रहिवास निर्माण करण्याचा भूमाफियांचा प्रयत्न होता. या चाळींच्यामध्ये रहिवास सुरू झाला की त्या बांधकामांवर कारवाई करताना अडथळा येणार होता. पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने या चाळीतील रहिवाशांना बाहेर काढून कारवाई करणे पालिका प्रशासनाला शक्य होणार नव्हते. या चाळींची बांधकामे अंतीम टप्प्यात असताना पालिकेच्या अ प्रभागातील बीट मुकादम यांच्या निदर्शनास मानविली गावातील या बेकायदा चाळी आल्या. त्यांनी अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांना या बांधकामांची माहिती दिली.

टिटवाळ्यात एकही नवीन बेकायदा बांधकाम उभे राहणार नाही यासाठी गेल्या वर्षापासून प्रयत्नशील असलेल्या साहाय्यक आयुक्त पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मानिवली येथे जाऊन संबंधित बेकायदा बांधकामांची पाहणी केली. या बेकायदा चाळींची उभारणी कोणी केली आहे. ही जागा कोणाच्या मालकीची आहे याची माहिती पाटील यांनी गावातून घेण्याचा प्रयत्न केला. कोणीही ग्रामस्थ गावात माफिया विरुध्द ग्रामस्थ वाद नको म्हणून सांगण्यास पुढे आला नाही. या बेकायदा चाळींची बांधकामे करणारे भूमाफिया, कारागिर घटनास्थळावरून पळून गेले होते.

या बेकायदा चाळींची माहिती ग्रामस्थ देत नाहीत. बांधकामधारक भूमाफियाही याठिकाणी येत नाहीत. त्यामुळे साहाय्यक आयुक्त पाटील यांनी या बेकायदा चाळी तोडण्याचा निर्णय घेतला. तोडकाम पथक, जेसीबी आणि ठेकेदाराचे कामगार घेऊन साहाय्यक पाटील यांंनी कोणत्याही दबावाला न जुमानता गेल्या आठवड्यात उभारलेल्या बेकायदा चाळी जेसीबी आणि तोडकाम पथकाच्या साहाय्याने जमीनदोस्त केल्या. या कारवाईमुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

या चाळींंमध्ये रहिवास सुरू झाला असता तर गावातील मुख्य वर्दळीच्या रस्त्याला बाधा आली असती. आणि भविष्यात रस्ता रूंदीकरण करताना अडथळा आला असता.

टिटवाळा अ प्रभाग हद्दीत बेकायदा बांधकामे करू नका, असे इशारे मागील नऊ महिन्यांपासून या भागातील बांधकामधारकांना देत आहोत. तरीही ते शासकीय सुट्टीचा दिवस, चोरून लपून बांधकाम करत आहेत. त्यामुळे त्यांची बेकायदा बांंधकामे निदर्शनास येताच भुईसपाट केली जात आहेत. बेकायदा बांधकामे, फेरीवाल्यां विरूध्दची कारवाई सुरूच राहणार आहे. – प्रमोद पाटील, साहाय्यक आयुक्त,अ प्रभाग.