शरीर तंदुरुस्त ठेवायचे असेल तर धावले पाहिजे, असा विचार करून कल्याण-डोंबिवलीत उत्साही धावपटूंचा १५० जणांचा एक गट फेसबुक, व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून तयार झाला आहे. यामधील सुमारे ४० ते ५० धावपटू दर रविवारी काटई ते बदलापूर जलवाहिनी रस्त्यावर सकाळीच जॉगिंगसाठी जमा होतात. या गटामध्ये डॉक्टर, वकील, अभियंते व अन्य व्यावसायिकांचा सहभाग आहे.
कल्याणमधील सुभाष मैदान, रेतीबंदर खाडी किनारा, डोंबिवलीत सावळाराम महाराज क्रीडासंकुल, जिमखाना, शिळफाटा रस्ता, रेतीबंदर गणेशघाट भागात दररोज सकाळी एकटेच फिरायला, धावायला येणारे धावपटू हळूहळू संघटित झाले. धावपटू म्हणून महापालिकेने आपणास एकाच ठिकाणी जॉगिंग करण्यासाठी व्यवस्था उपलब्ध करून दिली पाहिजे, असा विचार करून ही मंडळी व्हॉट्सअॅप, फेसबुकच्या माध्यमातून एकत्र येऊ लागली. समाजमाध्यमातून एका व्यासपीठावर आली. ‘कल्याण-डोंबिवली रनर ग्रुप’ या मंडळींनी स्थापन केला आहे.
या गटात कल्याण-डोंबिवलीत नियमित जॉगिंग तसेच व्यायाम करणाऱ्या सुमारे १५० जणांचा यात सहभाग आहे. हा गट नियमित फेसबुक, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एकत्र असतो. दर रविवारी या गटामधील सुमारे चाळीस ते पन्नास जण नियमित शिळफाटा रस्त्यावरील काटई ते बदलापूर जलवाहिनी रस्त्यावर अगदी नेवाळीपर्यंत धावण्याचा सराव करतात. कधी तरी गटामध्येच स्पर्धा लावून एकमेकांच्या धावण्याचा वेग तपासतात. या गटामध्ये ३० ते ६० वर्षांपर्यंतची मंडळी सहभागी आहेत. अधिकाधिक तरुणांनी या धावपटूंच्या गटात सहभागी व्हावे, असा प्रयत्न त्यांचा आहे. मुंबई, ठाणे परिसरात होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धामध्ये ही मंडळी उत्साहाने सहभागी होतात. या गटामध्ये डॉ.अजित ओक, सतीश गुर्जर, सुहास भोपी, डॉ. शोभा पाटील, डॉ. राजकुमार तिवारी, आशीष पाटील आदींचा समावेश आहे. रनर गटातील सर्व धावपटू आपल्या भागात नियमित धावण्याचा सराव करीत असतात.