महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण विभागातील अधिकाऱ्यांनी महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आधारवाडी क्षेपणभूमीला दोन वर्षांपूर्वी भेट दिली होती. या क्षेपणभूमीची पाहणी करून ती बंद करणे; तसेच कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासंबंधी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेला १४ सूचना केल्या होत्या. यापैकी एकाही सूचनेची दोन वर्षांत अंमलबजावणी झाली नसल्याचे उघड होत आहे.
महापालिका अधिकारी घनकचऱ्याच्या विषयावर गंभीर नसल्याचे यापूर्वीही स्पष्ट झाले आहे. महापालिकेचे तत्कालीन घनकचरा उपायुक्त अनिल डोंगरे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी भगवान सोळुंके, उपप्रादेशिक अधिकारी एल. टी. भिंगारदिवे, क्षेत्रीय अधिकारी कल्याणी पाटील, ए. जी. जाधव, जे. बी. भुसारा यांनी ऑक्टोबर २०१३ मध्ये आधारवाडी क्षेपणभूमीची संयुक्त पाहणी केली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशावरून हा पाहणी दौरा आखण्यात आला होता.
आधारवाडी भागात अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीतून क्षेपणभूमीवर ओला आणि सुका कचरा एकत्र टाकण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले होते. क्षेपणभूमीला संरक्षक भिंत नसल्याने या ठिकाणी निघणाऱ्या सांडपाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत नसल्याचे स्पष्ट झाले होते. हे सांडपाणी जवळच्या खाडीत सोडले जात असल्याचे निरीक्षण प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नोंदविले होते. कचऱ्याच्या अतिक्रमणामुळे या भागातील खारफुटी नष्ट होत आहेत.
आधारवाडी क्षेपणभूमीवरील ही अवस्था लक्षात घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेला क्षेपणभूमीवर शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी १४ सूचना केल्या होत्या. क्षेपणभूमीला संरक्षक भिंत बांधण्यात यावी. प्रवेशद्वारातून महापालिका कामगाराव्यतिरिक्त कोणालाही सोडू नये. या ठिकाणी ओला, सुका वेगळा करून त्यावर प्रक्रिया करावी. कचरा वेचक, प्राणी या भागात येणार नाहीत याची काळजी घ्यावी. कचऱ्याची दरुगधी पसरणार नाही यासाठी व्यवस्था करण्यात यावी. या भागात नियमित येणाऱ्या महापालिका कामगारांची नियमित आरोग्य तपासणी करावी. आधारवाडी क्षेपणभूमीवर या प्रक्रिया सुरू असतानाच, पालिकेने उंबर्डे येथील क्षेपणभूमी लवकरात लवकर सुरू होईल या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशा सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पालिकेस केल्या होत्या.