कल्याण : भिवंडी जवळील पडघा जंगल भागात बिबट्याचा वावर

भिवंडी जवळील पडघा वन विभागाच्या हद्दीत गेल्या १५ दिवसांपासून बिबट्याचा संचार असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

कल्याण : भिवंडी जवळील पडघा जंगल भागात बिबट्याचा वावर
( संग्रहित छायचित्र )

भिवंडी जवळील पडघा वन विभागाच्या हद्दीत गेल्या १५ दिवसांपासून बिबट्याचा संचार असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या वेळेत बिबट्याच्या डरकाळया ऐकू येत असल्याचे चिंचवली गावातील ग्रामस्थांनी सांगितले. बिबट्याचा माग काढण्यासाठी पडघा वन विभागाने त्यांच्या संचार असलेल्या भागात संचार मागोवा कॅमेरे (ट्रॅप) लावले आहेत.

पडघा वन विभागातील चिंचवली, पुंडास, खांडपे गाव हद्दीतील जंगलामध्ये काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या भागातील दोन ग्रामस्थांनी बिबट्याला प्रत्यक्ष पाहिले आहे. चिंचवली गावातील एका ग्रामस्थ रात्रीच्या वेळेत घराबाहेरील स्वच्छता गृहात गेला होता. त्यावेळी त्याला जंगलातून बिबट्याच्या डरकाळ्या ऐकू येत होत्या, अशी माहिती चिंचवलीचे ग्रामस्थ हेमंत पाडेकर यांनी दिली.
खांडपे गावाच्या हद्दीवर काही दुकाने आहेत. रात्रीच्या वेळेत जंगलातून बिबट्याच्या डरकाळ्या ऐकू आल्यानंतर भितीने खांडपे गाव हद्दीतील दुकानदारांनी दुकाने बंद करुन घेतली होती. बिबट्याचा वावर ‌वाढल्याने रात्रीच्या वेळेत पडघा ग्रामीण भागातील नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. मुंबई, ठाणे भागातून रात्रीच्या वेळेत दुचाकीवरुन येणाऱ्या नोकरदार, व्यावसायिकांनी बिबट्याच्या भितीने दिवसा उजेडी घरी येणे पसंत केले आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले.

चिंचवली ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील यांनी या संदर्भातची माहिती पडघा विभागीय वनाधिकारी शैलेश देवरे यांना दिली. वनाधिकारी देवरे यांच्या पथकाने ग्रामस्थांच्या माहितीप्रमाणे जंगलात जाऊन बिबट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना बिबट्याच्या पायाच्या ठशावरुन नर जातीचा तीन वर्षाचा बिबट्या असल्याचा अंदाज आला आहे. चिंचवली, पुंडास, खांडपे जंगल हद्दीत पडघा वनाधिकाऱ्यांनी मागोवा कॅमेरे लावले आहेत. जेणेकरुन बिबट्या कॅमेऱ्यात कैद होईल असे नियोजन या भागात केले आहे. दररोज विभागीय वनाधिकारी देवरे आणि त्यांचे पथक दिवसा, संध्याकाळच्या वेळेत या गावांमधील जंगल भागात भ्रमंती करुन बिबट्या कोठे आढळून येतो का याचा शोध घेत आहेत.

मादीच्या शोधार्थ

पडघा जंगल भागातील बिबट्या हा घोडबंदर, नागला बंदर भागातील जंगलातून संचार करत चिंचवली भागातील शांग्रीला रिसॉर्ट मागील जंगलात आला असण्याचा अंदाज ग्रामस्थांनी वर्तविला. बिबट्या प्रजातीचा हा विणीचा काळ असतो. या काळात नर बिबट्या मादीच्या शोधार्थ फिरत असतो. डरकाळ्या फोडून तो मादीला साद घालत असतो. मादीच्या शोधात बाहेर पडलेला बिबट्या हा संचारी असतो. त्यामुळे तो एका भागात थांबत नाही. तो त्याच्या मार्गाने निघून जात असतो, असे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगतिले.

पडघा वन विभाग हद्दीत १५ दिवसापूर्वी बिबट्याचा वावर असल्याची माहिती मिळाल्यावर चिंचवली परिसरातील जंगल भागात मागोवा कॅमेरे लावले आहेत. बिबट्या समोर आल्यास काय करावे व करु नये अशा जनजागृतीच्या सूचना केल्या आहेत. ग्रामस्थांनी समुहाने फिरण्याच्या सूचना केल्या आहेत. अद्याप मागोवा कॅमेऱ्यात बिबट्या कोठे कैद झालेला नाही. – शैलेश देवरे , विभागीय वन अधिकारी ,पडघा वन परिक्षेत्र, भिवंडी

चिंचवली, खांडपे, पुंडास परिसरात ग्रामस्थांनी बिबट्याला प्रत्यक्ष बघितले आहे. त्याच्या डरकाळ्या ऐकल्या आहेत. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जंगल भागात मागोवा कॅमेरे लावले आहेत. ग्रामस्थांना सावधानतेच्या सूचना वन अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. – हेमंत पाडेकर ,ग्रामस्थ, चिंचवली

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
डोंबिवलीत दिवस-रात्र खड्डे भरणीच्या कामांना वेग ; वाहतूक पोलिसांनी भरले खड्डे
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी