मोन्सेनियर फादर फ्रान्सिस कोरिया हे वसईत गेल्या ४९ वर्षांंपासून धर्मगुरू म्हणून कार्यरत आहेत. धर्मगुरू म्हणून केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना मॉन्सेनिअर हा ‘किताब’ मिळाला आहे. म्हणून त्याच्या नावापुढे मोन्सी लिहितात. मॉन्सेनियर कोरिया हे धर्मगुरू असले तरी त्यांची ओळख लेखक म्हणून आहे. त्यांनी आजवर ३२ पुस्तके लिहिली आहेत. ‘सामवेदी ख्रिस्ती समाज’ , ‘मधाच्या घागरी ‘ तसेच वसई किल्लय़ातून नेलेल्या व आजवर हिंदू तीर्थ क्षेत्री असलेल्या ३८ घंटांचा शोध ९ जिल्ह्यात जाऊन त्यांनी लावला. त्यावरही त्यांनी पुस्तक लिहिले आहे. ‘बायबल मधील स्त्रिया ‘ आणि ‘ महंतांच्या सहवासात’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. सध्या ते सुवार्ता मासिकाचे सहसंपादक म्हणून काम करत आहेत.
पुस्तके म्हणजे माझ्या आयुष्याची खिडकी आहे. त्या खिडकीतून माझ्या जीवनाकडे पाहणे मला आवडते. लेखक पुस्तक घडवतो. पण बायबल हे लेखकांना घडवते. असे म्हणतात की ‘इंग्लंड मेड शेक्सपिअर बट बायबल मेड इंग्लंड’. बायबलचे दूध मला लहानपणीच आईच्या दुधातून चाखायला मिळाले. म्हणून त्याची गोडी अवीट आहे. याच बायबल मधली शिकवण माझ्या लिखाणाद्वारे मी माझ्या वाचकांना देत असतो. आजवर जवळजवळ ३०-३२ पुस्तके लिहून ती हातावेगळी केली आहेत. त्यातील दोन पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळाला आहे.
मला लहानपणापासून वाचनाची आवड नव्हती पण माझ्या धर्मगुरू जीवनाच्या तयारीसाठी कॉलेजचा अभ्यास करताना आमच्या लायब्ररीत मला वि.स. खांडेकर यांची अश्रू नावाची कादंबरी वाचनात आली. त्यातील शंकर या शिक्षकाने माझ्या मनात कायमचे घर केले. व त्या पाठोपाठ याच लेखकाच्या अनेक कादंबऱ्या मी नजरेखालून घातल्या. त्या मला फार आवडल्या. त्यात ‘उल्का’, ‘हिरवाचाफा’, ‘पांढरे ढग’ अशा कित्येक कादंबऱ्या मला भावल्या. माझ्या लेखनावर याच लेखकाच्या काव्यमय लेखन शैलीची छाप पडली आहे. वास्तविक ५५ वर्षांपूर्वी माझी पहिली लहू कथा जी प्रसिद्ध झाली त्या लेखाचे शीर्षक होते ‘ दोन अश्रू ‘. त्या घटकेपासून माझ्या लेखन प्रवासाला सुरवात झाली. या लेखकाने मला त्याच्या इतक्या प्रेमात पाडले होते की, मी धर्मगुरू झाल्यावर माझ्या उमेदीच्या वयात मी मुंबई जुहू येथून १९७२ च्या उन्हाळी रजेत टळटळत्या उन्हात स्कुटर घेतली आणि लेखकाच्या शोधात तळकोकणात जाऊन पोहोचलो. मला वाटले की ते शिरोडा टय़ुटोरियल स्कुल मध्ये अद्यापही शिकवत असतील. परंतु ते तिथून निवृत्त होऊन कोल्हापूर येथे राहतात असे समजले. मग थेट कोल्हापूर येथील शिवाजी विद्यपीठ गाठले असता तेथील प्राध्यापकांनी खांडेकरांना भेटण्यास मदत केली. एका कॅथलिक धर्मगुरुने गावोगावी त्यांच्या शोधार्थ त्यांना धुंडाळत फिरले याचे त्यांना आश्चर्य वाटले. त्यांच्या घराच्या मी पायऱ्या चढत आहेत हे पाहून मी त्यांना नमस्कार करण्याऐवजी त्या वयोवृद्ध साहित्यिकाने माझेच पाय धरले. ती मनोज्ञ अशी भेट होती. आज माझ्या अभ्यासिकेत माझ्या वडिलांचा फोटो नाही परंतु या व्यक्तीचा फोटो मी आजही फ्रेम केलेला आहे.
शिक्षणानंतर माझ्याहातून अनेक इंग्रजी व मराठी अंक चाळले गेले. दरम्यान मी गुजराती शिकलो. त्यातील कादंबऱ्या वाचू लागलो. पण मराठी कादंबरीची जी वीण माझ्यात गुंफली गेली ती आजवर घट्ट राहिली आहे. मी इतिहासाचा विद्यार्थी नाही, प्राध्यापक तर नाहीच नाही. पण आमचे चर्च हे इतिहासात वावरते. इतकेच नव्हे तर ते इतिहास घडवते व इतिहासाला वळण देते. कारण चर्च ला २००० वर्षांची परंपरा आहे. म्हणून मी इतिहासाच्या अभ्यासाकडे वळलो. व त्या इतिहासाचा परिपाक म्हणून माझ्या हातून चर्च च्या इतिहासाविषयी जवळजवळ १५ पुस्तके लिहिली गेली. माझ्यामध्ये चर्चची हिस्ट्री ( History ) ही त्या शब्दातील स्पेलिंग प्रमाणे His story आहे. म्हणजेच येशूची कथा आहे.
माझे ग्रंथालय दोन ते तीन ठिकाणी आहे. पुस्तकांची बरीच कपाटे आहेत. मात्र पुस्तके शिस्तबद्ध लावलेली नाहीत. येणारा जाणारा प्रत्येक पाहुणा माझ्या सर्व ग्रंथांना व पुस्तकांना पसारा असे म्हणतो. पण या पसाऱ्यात काय पडले आहे हे मला माहित आहे. मी प्रसिद्ध केलेल्या पुस्तकांच्या प्रती माझ्याकडेच नसतात याचे बऱ्याचशा लोकांना नवल वाटते. माझी बरीचशी पुस्तके अनेक अभ्यासकांच्या घरी आहेत. तशी त्यांचीही पुस्तके माझ्या कपाटात कोंबलेली आहेत. लवकरच माझ्या वयाला ७७ वर्षे पुर्ण होतील. जो पर्यंत मोती बिंदुचा त्रास होत नाही तो पर्यंत वाचनाचा व अभ्यासाचा हा ध्यास सतत चालू राहावा असे मला मनोमन वाटते. मला शीघ्र गतीने वाचता येत नाही. म्हणून मी वाचलेली पुस्तके कमी आहेत. पण जवळ जवळ ती सर्वच पुस्तके मी अभ्यासलेली आहेत असे म्हणता येईल. अनेक रंगाच्या पेन्सिलीने माझी पुस्तके अधोरेखित केलेली आहेत. वयाची ७५ री पूर्ण करेपर्यंत मी सुवार्ता या वसईतील मासिकाचा संपादक होतो. आता वयाची बाधा असल्याने मी सहसंपादक आहे. फावल्या वेळात मी इतिहासाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात मदत देतो.
खांडेकरांनंतर माझ्या वाचनात आले ते प्रो. फडके, आचार्य अत्रे, पु ल देशपांडे. तसेच व. पु. काळे यांच्याही अनेक कादंबऱ्या मी वाचलेल्या आहेत. रंगनाथ पठारे यांच्या शोधक नजरेतून प्रसिद्ध झालेली पुस्तकेही मला आवडतात. विनोदी साहित्य मला जास्त आवडते म्हणून पु. ल. देशपांडे या विनोदी लेखकाचे पुस्तक पहिले की माझा हात सहज तिथे जातो. मी धर्मगुरू असल्यामुळे माझ्या व्यवसायाला साजेशी अशी पुस्तके, मासिके, नियतकालिके मला चाळावीच लागतात. त्याचा खच माझ्या टेबलावर असतोच. लोकसत्ता या दैनिकाचे एके काळचे संपादक ख. रा. महाजन हे माझे आवडते संपादक. ‘रविवारची चिंतनिका’ हे सदर ते चालवत. आज माझ्या सुवार्ता मासिकाच्या शेवटी चिंतानिका नावाचे जे लोकप्रिय ठरलेले जे सदर आहे. त्याच्या बुडाशी महाजन यांची रविवारची चिंतानिका दडली आहे असेच म्हटले पाहिजे.
शब्दांकन- वैष्णवी राऊत