|| मानसी जोशी

सुरक्षारक्षकांची संख्या तिपटीने वाढवण्याची गरज:- ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी १७२ सुरक्षारक्षकांची गरज असताना रुग्णालयात जेमतेम ४३ सुरक्षारक्षकच असल्याची बाब समोर आली आहे. सुरक्षारक्षकांची संख्या तोकडी असल्यामुळे आणखी १२३ सुरक्षारक्षक वाढवून देण्याचा प्रस्ताव रुग्णालय प्रशासनाने सुरक्षा विभागाला दिला आहे. मात्र, दोन महिने उलटूनही सुरक्षारक्षक वाढवून देण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसून यामुळे रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या रुग्णालयामध्ये ठाणे शहरासह जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागांतून दररोज हजारो रुग्ण उपचारांसाठी येतात. या रुग्णांसोबत त्यांचे नातेवाईकही येतात. काही रुग्णांना तपासणीनंतर उपचारासाठी दाखल करून घेण्यात येते. त्यानंतर त्याचे नातेवाईकही रुग्णालयात थांबतात. त्यामुळे कक्षाच्या बाहेर नातेवाईकांची मोठी गर्दी होते. या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी रुग्णालयात पुरेसे सुरक्षारक्षक नसून ही गर्दी नियंत्रित करताना सुरक्षारक्षकांचे नातेवाईकांसोबत वाद होतात. तसेच यापूर्वी रुग्णालयात चोरीच्या घटना घडल्या आहेत, तर गेल्या आठवडय़ात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेने डॉक्टरवर हल्ला केला होता.

कळवा रुग्णालयातील प्रवेशद्वार आणि वॉर्डाबाहेर एकूण १७२ सुरक्षारक्षकांची गरज आहे. प्रत्यक्षात मात्र रुग्णालयात ४३ सुरक्षारक्षक असून त्यांच्यावर रुग्णालयाच्या सुरक्षेची भिस्त आहे. त्यामुळे सुरक्षारक्षकांवर अतिरिक्त कामाचा ताण आहे. रुग्णालयाच्या सुरक्षेसाठी आणखी १२९ सुरक्षारक्षकांची गरज असून नेमकी ही बाब लक्षात घेऊन रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संध्या खडसे यांनी वाढीव सुरक्षारक्षकांचा प्रस्ताव दोन महिन्यांपूर्वी महापालिका सुरक्षा विभागाला दिला आहे. मात्र, अजूनही या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.

ठाणे महापालिकेच्या सुरक्षा विभागाकडे दोन महिन्यांपूर्वी वाढीव सुरक्षारक्षक देण्याचा प्रस्ताव पाठविला होता. वरिष्ठ पातळीवर याबाबत चर्चा सुरू आहे. महापालिकेकडून लवकरात लवकर सुरक्षारक्षक देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.  – डॉ. संध्या खडसे, वैद्यकीय अधिष्ठाता, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा