ठाणे : ठाणे आणि घोडबंदरपाठोपाठ आता कळवा परिसरात नाट्यगृह उभारणीचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाने घेतला असून या नाट्यगृहाच्या उभारणीसाठी राज्य शासनाने ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हे नाट्यगृह १२ हजार ७०० चौरस मीटर आरक्षित भूखंडावर उभारण्यात येणार असून तळघर, तळमजला अधिक २ मजले अशी नाट्यगृहाची वास्तु उभारण्यात येणार असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.

ठाणे शहराच्या मध्यवर्ती परिसर असलेल्या जांभळी नाका परिसरात मासुंदा तलावाला लागून राम गणेश गडकरी नाट्यगृह आहे. तर घोडबंदर परिसरातील हिरानंदानी मेडोस येथे डॉ. काशिनाथ घाणेकरन नाट्यगृह आहे. असे असले तरी खाडीपलीकडे असलेल्या कळवा, दिवा आणि मुंब्रा भागात नाट्यगृह नाही. यामुळे येथील नाट्यरसिकांना ठाण्यात यावे लागते. या पार्श्वभूमीवर कळव्यात नाट्यगृह उभारणीची मागणी गेल्या काही वर्षांपासून होत होती. यापुर्वी पालिकेच्या अर्थसंकल्पात घोषणाही करण्यात आली होती. मात्र, त्या केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र होते.

कळवा येथील यशवंत रामा साळवी तरण तलाव पूर्ण पाडून नव्याने बांधण्यात यावा. त्यात, तलाव, प्रेक्षागृह, इतर खेळांच्या सुविधा आदीची रचना केली जावी. त्याचा विस्तृत आराखडा सादर करावा. कळवा परिसरातील नागरिकांसाठी तिथे उत्तम सुविधा निर्माण व्हावी. तसेच खारेगाव येथील नाट्यगृहाच्या आरक्षणाच्या जागेवर छोटेखानी नाट्यगृहासह इतर सुविधा क्रीडा संकुल याची आखणी करून त्याचा सविस्तर आराखडा करावा, यासाठी पालिकेेत काहि महिन्यांपुर्वी महत्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीला खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार जितेंद्र आव्हाड, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे उपस्थित होते. या बैठकीत कळव्यात नाट्यगृह उभारणीचा निर्णय घेऊन त्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या नाट्यगृहाच्या उभारणीसाठी पालिकेने राज्याच्या नगरविकास विभागाकडे मागणी केली होती. त्यास राज्य शासनाने मान्यता देऊन ४० कोटींचा निधी मंजूर केला आहे. यामुळे नाट्यगृह उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

कळवा येथील खारेगाव परिसरात ड्रामा थेअटर नावाने १२ हजार ७०० चौरस मीटरचा भूखंड नाट्यगृहासाठी आरक्षित करण्यात आला आहे. या भूखंडावर हे नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. तळघर, तळ अधिक दोन मजले अशी नाट्यगृहाची वास्तु असणार आहे. यामध्ये सुमारे पाचशेहून अधिक आसन क्षमता असणार आहे. तसेच उपहारगृह देखील असणार आहे. तसेच वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये चार चाकी वाहनांसाठी १७५ तर, ८५ दुचाकी उभ्या करता येणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.