उल्हासनगर: उल्हासनगर शहर पुन्हा एकदा एका हत्येच्या घटनेने हादरले आहे. उल्हासनगरातील कॅम्प एक भागात जुन्या वादातून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. साजिद शेख असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
या घटनेतील आरोपी रोहित पासी आणि मृत साजिद शेख यांचे काही वाद झाले होते. हे वाद मिटवण्यासाठी दोन दिवसांपूर्वी त्यांनी एकमेकांशी भेटही घेतली अशी माहिती आहे. या भेटीत वाद मिटण्याऐवजी ते वाढले. २ ऑगस्ट रोजी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास रोहित पासी आणि त्याचा साथीदार प्रवीण उज्जैनवाल यांनी साजिदच्या मित्राला रस्त्यात अडवले.
साजिदला बोलवण्यासाठी त्याला धमकी देण्यात आली. त्यावेळी साजिद शेख मित्राच्या मदतीसाठी धावून गेला. मात्र त्याचवेळी साजिदवर दहा ते पंधरा जणांनी मिळून हल्ला चढवला. धारदार शस्त्रांनी झालेल्या हल्ल्यात साजिद शेख गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तेथे साजिद शेख याला मृत घोषित केले. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.
या घटनेनंतर उल्हासनगर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत रोहित पासी आणि प्रवीण उज्जीनवाल यांना अटक केली. मात्र उर्वरित आरोपी अजूनही फरार आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या साजिदच्या गरोदर पत्नीने रुग्णालयातच मृतदेह स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. सर्व आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत साजिदचे शव उचलणार नाही, असा पवित्रा साजिदच्या पत्नीने घेतला होता.bया घटनेनंतर परिसरात खळबळ माजली असून नागरिकांत भीतीचं वातावरण आहे.
पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत करण्यात आली आहेत. पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांच्या नेतृत्वाखाली तपास वेगाने सुरू असून, लवकरच उर्वरित आरोपींना अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. गेले काही महिन्यात परिमंडळ चार मध्ये गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. हत्या, गोळीबार या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली आहे.
अंबरनाथ येथील बांधकाम व्यवसायिकाच्या घरावर झालेला गोळीबार, बदलापूर येथे एका व्यक्तीवर टोळीने केलेला गोळीबार या घटनांनी बदलापूर आणि अंबरनाथ ही शहरे सुद्धा हादरून गेली होती. उल्हासनगर शहरातच विनयभंगाच्या प्रकरणातील आरोपीने पीडित तरुणीच्या घरासमोरच मिरवणूक काढून कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढले होते. त्यामुळे हे प्रकार रोखण्यासाठी कठोर कारवाईची मागणी होते आहे.