लोकसत्ता वार्ताहर

शहापूर : शिवीगाळ करत असल्याच्या कारणावरून स्वत:च्या नऊ वर्षीय मुलाच्या तोंडात वहीच्या पानाचा बोळा कोंबून त्याची हत्या करणाऱ्या एकनाथ गायकवाड याला कसारा पोलिसांनी अटक केली आहे. त्याने मुलाच्या हत्येचे सुरुवातीला बनाव रचला होता. पण, तपासाअंती त्याने हत्या केल्याचे उघड झाले. या मुलाची हत्या झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

तालुक्यातील वाशाळा येथे एकनाथ गायकवाड हा राहतो. त्याच्यासोबत त्याचा भाऊ आणि मुलगा युवराज राहत होता. एकनाथ गाकवाड याला मद्य पिण्याची सवय होती. घरगुती भांडणांमुळे त्याची पत्नी चार महिन्यांपासून वेगळी राहात आहे. युवराज हा एकनाथ यांना शिवीगाळ करत असे. त्यामुळे एकनाथ यांना संताप येत होता. सोमवारी खेळायला गेलेल्या युवराज याला बोलावल्यावर युवराजने त्याला शिवीगाळ केली. याचा राग आल्याने एकनाथ याने युवराजला घराजवळील शेतात नेले. तिथे त्याच्या तोंडात वहीच्या पानांचा बोळा कोंबून त्याची हत्या केली.

आणखी वाचा-कोपरमधील उद्यानाच्या आरक्षणावरील बेकायदा इमारतीवर हातोडा?

प्रथमतः एकनाथ याने युवराजचे एका अज्ञात व्यक्तीने अपहरण करून त्याची हत्या केल्याचा बनाव रचला होता. परंतु पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्याची सखोल चौकशी केली. तसेच घटनास्थळी श्वानपथकही पाचारण करण्यात आले होते. तपासात हा हत्येचा बनाव उघड झाला. याप्रकरणी एकनाथ याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपाली धाटे यांनी घटनास्थळी भेट दिली असून अधिक तपास सुरू आहे.