ठाणे : मुंबई नाशिक महामार्गालगच्या येवई भागात एका गोदामाला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. या आगीत गोदामातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नसले तरी संपूर्ण आग शमविण्यासाठी आणखी दोन दिवस लागणार असल्याचे भिवंडी महापालिकेच्या अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. भिवंडीत मंगळवारी सायंकाळी अशाचप्रकारे एका शिववणी वर्गाला आग लागली होती. त्यामुळे शहरात अग्नीसत्र सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भिवंडी येथील येवई गाव परिसरात आर. के. लाॅजिस्टीक परिसरात तीन कंपन्यांचे एक गोदाम आहे. प्राथमिक माहितीनुसार, या गोदामांमध्ये सौंदर्य प्रसाधनांचा साठा असतो. बुधवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास या गोदामाला अचानक भीषण आग लागली. अवघ्या काही क्षणात आगीने रौद्ररुप धारण केले. धुराचे लोट हवेत पसरले होते. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती भिवंडी महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर भिवंडी अग्निशमन दलाचे पथके घटनास्थळी दाखल झाले. ही आग इतकी भीषण होती की, आगीवर नियंत्रण मिळविणे पथकाला शक्य होत नव्हते. या अगीमध्ये कंपनीतील लाखो रुपयांचा साठा आगीत भस्मसात झाला. पथकाला सात तासानंतर येथील आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले. परंतु आग बुधवारी सायंकाळनंतरही धुमसत होती. त्यामुळे ही आग पूर्णपणे विजविण्यासाठी आणखी दोन दिवस लागू शकतात अशी माहिती भिवंडी महापालिकेच्या अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेश पवार यांनी दिली.

दरम्यान, मंगळवारी देखील भिवंडी येथील ठाणगे आळी परिसरातील एका शिववणी वर्गाला आग लागली होती. ठाणगे आळी येथील ठक्कर कॉम्प्लेक्समध्ये विनटॉप क्लासेस नावाने शिकवणी आहे. परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थी शिकवणीच्या दुसऱ्या मजल्यावरील वर्गात अभ्यास करत होते. मंगळवारी सायंकाळी अचानक येथील वातानुकूलीत यंत्रणेमधून धूर येऊ लागला. त्यामुळे खबरदारी घेत शिकवणीतील ४० विद्यार्थ्यांना तळमजल्यावर आणण्यात आले. या आगीची झळ हळूहळू शिकवणीच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत पसरली. दरम्यान अग्निशमन दलाची दोन वाहने घटनास्थळी आले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. यावेळी टोरेंट पॉवर कंपनीच्या पथकाने घटनास्थळी येऊन आजूबाजूचा वीजप्रवाह खंडित केला. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यास व्यत्यय आला नाही. परंतु या आगीमध्ये विनटॉप क्लासेस या शिकवणीच्या मालमत्तेचे नुकसान झाले.या घटनांमुळे भिवंडी शहरात आगीचे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Massive fire destroyed materials in godown on mumbai nashik highway on wednesday morning sud 02