ठाणे : घोडबंदर मार्गावरील कापूरबावडी भागात रविवारी मेट्रो कामा दरम्यान मेट्रोच्या उन्नत मार्गिकेवरून दोन लोखंडी रॉड रस्त्यावरून वाहतुक करणाऱ्या कारवर पडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वाहन चालकाने कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आता येथील सुरक्षा अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. कापूरबावडी भागात यापूर्वी दोनवेळा अशा घटना घडल्या होत्या. तर भिवंडीत एका तरुणाच्या डोक्यात सळई शिरली होती. या घटनांमुळे प्रवाशांच्या आणि वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ठाणे शहरात मेट्रो चार (ठाणे- घाटकोपर-वडाळा) आणि मेट्रो पाच (ठाणे-भिवंडी-कल्याण) या मार्गिकेच्या निर्माणाची कामे सुरू आहेत. मेट्रो चार आणि पाच या दोन्ही मार्गिकांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या टप्प्याची कामे कापूरबावडी येथे सुरू असतानाही येथे कामामध्ये निष्काळजीपणा दिसून येत आहे. रविवारी दुपारी भिवंडी येथील काल्हेर भागात राहणारे ४७ वर्षीय अमोल लाठे हे त्यांच्या ८३ वर्षीय वडिलांना कारमधून घोडबंदर येथील एका खासगी रुग्णालयात गेले होते.
परंतु रुग्णालय बंद असल्याने ते घोडबंदर येथून कापूरबावडी मार्गे काल्हेर येथे परतत होते. ते कापूरबावडी येथे आले असता, अचानक मेट्रोच्या कामासाठी उन्नत मार्गावर ठेवलेले दोन लोखंडी राॅड त्यांच्या वाहनावर पडले. हे राॅड कारच्या आरशावर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर संतापलेल्या अमोल लाठे यांनी तेथील कंत्राटदार कर्मचाऱ्यांना जाब विचारला. तसेच पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते.
तक्रारीत काय म्हटले
– मेट्रो मार्गिकेसाठी ठेवण्यात आलेले दोन राॅड अमोल लाठे यांच्या वाहनावर पडले. हे राॅड पडल्याने वाहनाचे नुकसान झाले आहे. तसेच कामाच्या ठिकाणी कोणत्याही सुरक्षा साधनांचा वापर करण्यात आला नाही. त्यामुळे येथील सुरक्षा विभागाचे अधिकारी प्रमोद मोहीते (२२) यांच्यावर कायदेशीर तक्रार असल्याचे पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ चे कलम १२५ आणि ३२४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
यापूर्वी दोन घटना
– कापूरबावडी भागात यापूर्वी अशा दोन घटना उघडकीस आल्या होत्या. ३० जुलैला तत्वज्ञान विद्यापीठ भागातून प्रवास करणाऱ्या वाहन चालकाच्या कारवर राॅड पडला. या घटनेत चालक थोडक्यात बचावला होता. – २ मे या दिवशी एका कारवर मेट्रो कामासाठी बसविण्यात आलेल्या क्रेनचा भाग कोसळला. या घटनेतही चालक आणि त्याचे कुटुंबिय बचावले होते. आता अमोल यांच्यासोबत ही घटना घडल्याने कंत्राटदारांच्या कामाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.