ठाणे : वर्तकनगर येथील म्हाडा वसाहतींचा क्लस्टरच्या माध्यमातून पूनर्विकास केला जाणार असल्याने या निर्णाया विरोधात म्हाडा वसाहतीमधील नागरिकांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. ‘क्लस्टर योजना हटवा, म्हाडा वाचवा’ अशा घोषणा देत वर्तकनगर येथील नवीन म्हाडा वसाहतीतील शेकडो रहिवासी रस्त्यावर उतरले होते. सरकारने आमच्या वसाहतीस क्लस्टरमधून वगळले नाही तर, कायदेशीर लढाई पुकारु असा इशारा येथील रहिवाशांनी दिला.
ठाणे शहरातील वर्तकनगर, पवारनगर, भीमनगर परिसरात म्हाडाच्या जमीनी आहेत. या जमीनींवर म्हाडाने बैठ्या तसेच इमारतींच्या माध्यमातून वसाहती उभ्या आहेत. या वसाहती जुन्या आहेत. येथील परिसराचा ठाणे महापालिकेने ४९ नागरी पुनरुत्थान आराखड्यांमध्ये सामावेश केला आहे. येथील जमीनी म्हाडाच्या मालकीची असल्याने महापालिकेला याठिकाणी क्लस्टर योजना राबविणे शक्य होणार नाही. त्यामुळे महापालिकेने येथील ४९.३५ एकर इतकी जागा भाडेतत्त्वावर देण्याकरिता म्हाडाकडे ना हरकत प्रमाणपत्र मागितले आहे. परंतु क्लस्टर योजनेस आता म्हाडा वसाहतीतील रहिवाशांना विरोध करण्यास सुरुवात केली आहे.
वर्तकनगर येथील नवी म्हाडा वसाहत परिसरात साईनाथ को-ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी ही ३० वर्ष जुनी वसाहत आहे. सुमारे अडीच ते तीन हजार नागरिक येथे राहतात. रविवारी येथील शेकडो रहिवाशांनी क्लस्टर योजने विरोधात रस्त्यावर उतरत शांततेच्या मार्गाने आंदोलन केले. तसेच क्लस्टर योजनेविरोधात घोषणा दिल्या. क्लस्टरसाठी २०१८ मध्येच हरकती नोंदविल्या होत्या. आम्ही म्हाडा गृहनिर्माण योजनेचे लाभार्थी भूखंडधारक आहोत. आम्ही स्वत: पूनर्विकास करण्यासाठी पात्र ठरतो. तसा प्रस्ताव देखील म्हाडाकडे सादर केला आहे असे असतानाही आम्हाला क्लस्टरमध्ये सामाविष्ट केले जात आहे. क्लस्टर योजना म्हाडासाठी लागू होत नाही अशी प्रतिक्रिया येथील रहिवाशांनी दिली.
ठाणे महापालिककेने २०१८ मध्ये क्लस्टर संदर्भात हरकती मागविल्या होत्या. त्यावेळी २८८ हरकती नोदंविल्या होत्या. क्लस्टर योजना झोपडपट्टीसाठी आहे. पण आम्ही म्हाडा वसाहतीतील आहोत. आम्हाला क्लस्टर योजना लागू होत नाही. क्लस्टर योजना राबविल्यास ती कधी पूर्ण होईल हा देखील प्रश्न आहे. – शिवाजी उतेकर, अध्यक्ष, साईनाथ को-ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी लि.
ही म्हाडा वसाहत ३० वर्ष जुनी आहे. आम्ही सर्व कर म्हाडाला भरतो. आमचा क्लस्टर योजनेत सामावेश केला जात आहे. त्यामुळे आम्ही नागरिकांनी क्लस्टर योजने विरोधात शांततेत आंदोलन केले. आम्हाला क्लस्टर योजना नकोच, आमच्यावर क्लस्टर योजना लादण्याचा प्रयत्न झाल्यास कायदेशीर मार्गाने लढाई सुरु करु. – सुरेश चिखले, सचिव, साईनाथ को-ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी लि.
© The Indian Express (P) Ltd