ठाणे महापालिकेचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असून ते संघटीत गुन्हेगारांचा म्होरक्या असल्याचा गंभीर आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यांसदर्भाचे पत्र त्यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात दिले आहे. महेश आहेर यांनी माझ्या कुटुंबियांना जीवे ठार मारण्याचे कारस्थान केले असून त्यासाठी गुन्हेगारांचा वापर केला आहे. त्यामुळे आहेर यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी त्यांनी पत्रात केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> महापालिका मुख्यालयाबाहेर झालेल्या हल्ल्यानंतर महेश आहेरांचा जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप; म्हणाले, “माझ्या…”

ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर हे सायंकाळी कामकाज संपवून घरी जात होते. राष्ट्रवादीच्या  कार्यकर्त्यांनी येऊन त्यांना मारहाण केली. जितेंद्र आव्हाड यांच्या मुलींना मारण्याची धमकी देतो का असे बोलत कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली.  राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबाला संपवण्यासाठी तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शूटर तैनात केल्याच्या संभाषणाची एक ध्वनिफीत प्रसारित झाली असून या ध्वनिफितमधील संभाषण सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचे असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केल्यानंतर ही मारहाण झाल्याचे कळते आहे.

हेही वाचा >>> “एखाद्या डॉन प्रमाणे…” ऋता आव्हाड यांचे ठाणे मनपा अधिकाऱ्यावर गंभीर आरोप, म्हणाल्या… “मुख्यमंत्री महोदय आता बस…”

दरम्यान आहेर यांनी याप्रकरणात आव्हाड यांच्याविरोधात तक्रार नोंदविली आहे. त्यानंतर आव्हाड यांनीही आहेर यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे पत्र वर्तकनगर पोलिसांना दिले आहे.  त्यामध्ये त्यांनी ती ध्ननिफीत आहेर यांची असून त्यांनी मुलीला आणि जावयाला जीवे मारण्यासाठी कारस्थान केल्याचा आरोप केला आहे. आहेर यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई केली जावी असे त्यांचे म्हणणे आहे. आहेर हे ठाणे महापालिकेचे कर्मचारी  असल्याचे भासवित आहेत. परंतु ते संघटीत गुन्हेगारांचा म्होरक्या असल्याचा आरोपही पत्राद्वारे आव्हाड यांनी केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla jitendra awad made allegation that thane tmc assistant commissioner mahesh aher links with underworld zws