|| भगवान मंडलिक

‘एमएमआरडीए’ची माहिती; कल्याणमधील नवीन १२ इमारती जमीनदोस्त होणार! :- कल्याणमधील दुर्गाडी किल्ला, शिवाजी चौक ते कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक, बाजार समिती रस्त्यावर मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो मार्ग तीन वर्षांपूर्वी प्रस्तावित केला आहे. मेट्रो मार्गिकेत येणाऱ्या इमारतींचे सर्वेक्षण करून अडथळा ठरणाऱ्या इमारती पालिकेकडून जमीनदोस्त करून घेतल्या जातील, अशी माहिती ‘एमएमआरडीए’च्या एका विश्वसनीय उच्चपदस्थ सूत्राने दिली.

कल्याणमधील कोणत्याही मालमत्तेला धक्का लागणार नाही, अशा पद्धतीने सर्वेक्षण करून शहरातील मेट्रो मार्ग प्रस्तावित केला आहे. गूगल नकाशावर, ‘एमएमआरडीए’च्या संकेतस्थळावर तो खुला करण्यात आला आहे. या मार्गिकेत नवीन, जुन्या पुनर्विकसित बांधकामांना परवानगी देऊ नये. अशा परवानग्यांचे प्रस्ताव ‘एमएमआरडीए’कडे पाठवावेत. प्राधिकरणाने ना हरकत दिल्याशिवाय अशा बांधकामांना परवानगी देऊ नये, असे पालिकेला कळवूनही नगररचना विभागाने मेट्रो मार्गिकेत १२ टोलेजंग इमारतींना बांधकाम परवानगी दिली असेल तर, या मार्गिकेचे पुन्हा सर्वेक्षण केले जाईल. या मार्गिकेच्या दोन्ही बाजूंनी किमान पाच-पाच मीटर भागात पालिकेने बांधकाम परवानगी दिली असेल तर त्या इमारती जमीनदोस्त कराव्या लागतील. हे पाडकाम पालिकेला करून द्यावे लागणार आहे, असे प्राधिकरणाच्या सूत्राने सांगितले.

मेट्रो मार्गिकेत काही ठिकाणी थांबा, प्रवाशांना जमिनीवर उतरण्यासाठी उद्वहन, जिना, अत्यावश्यक प्रसंगी अग्निशमन, रुग्णवाहिका मार्गिकेच्या दोन्ही बाजूंनी विनाअडथळा जाईल, असा मोकळा मार्ग असणे आवश्यक आहे. हीच जागा इमारत बांधकामाने व्यापली असेल तर ती बांधकामे नवीकोरी असली तरी ती तोडली जातील, असे सूत्राने सांगितले.

मेट्रो मार्ग केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प समन्वयक ‘एमएमआरडीए’ला २०२२ पर्यंत पूर्ण करायचा आहे. काम सुरू झाल्यानंतर या कामात कोणताही अडथळा नको म्हणून कल्याण शहरातील मेट्रो मार्गाचा प्रस्तावित रस्ता खुला ठेवा. त्यात कोणत्याही प्रकारचे बांधकाम, पुनर्विकासातील इमारत होऊ देऊ नका, असे प्राधिकरणाचे तत्कालीन आयुक्त येर पल्ली सिंग मदान यांनी तत्कालीन पालिका आयुक्त ई. रवींद्रन यांना कळविले होते. तत्कालीन शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी हे पत्र नगररचना विभागाला पाठवून कल्याणमधील प्रस्तावित मेट्रो मार्गिकेत कोणत्याही नवीन, जुन्या इमारत बांधकामाला परवानगी देताना प्राधिकरणाची ‘एनओसी’ घ्यावी असे सुचविले होते. तरीही नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे एमएमआरडीचे पत्र दुर्लक्षित करून मेट्रो मार्गिकेच्या मार्गात १२ विकासकांच्या टोलेजंग इमारतींना परवानगी दिली, अशा तक्रारी आहेत.

प्रकल्प अहवालाचे काम

मेट्रो मार्गात परवानग्या देणाऱ्या नगररचना अधिकाऱ्यांना आयुक्त गोविंद बोडके यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. काही अधिकाऱ्यांनी खुलासे सादर केले आहेत. भिवंडीतील मेट्रो स्थानके निश्चित झाली की मग कल्याण मेट्रो मार्गाकडे लक्ष देण्यात येणार आहे. सध्या या कामांचे विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याची कामे सुरू आहेत.