ठाणे : हत्येच्या गुन्ह्यात फरार झालेला आरोपीला १६ वर्षांनंतर ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. संतोष कुऱ्हाडे (५०) असे आरोपीचे नाव असून हत्या करुन फरार झाल्यानंतर तो पालघरमधील वखारीत काम करत होता.

ठाणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक डाॅ. डी. एस. स्वामी यांनी फरारी आरोपींवर कारवाई करण्याचे आदेश पथकांना दिले होते. त्याअनुशंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या आणि पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी तपास सुरु केला होता. दरम्यान, शहापूर येथील तानसा भागात राहणारा संतोष कुऱ्हाडे हा १६ वर्षांपासून फरार असलेला आरोपी पालघर जिल्ह्यातील वाडा भागात लपल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे साहाय्यक फौजदार धनाजी कडव यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पथकाने सापळा रचून वाडा येथील बनसारपाडा भागातून संतोष कुऱ्हाडे याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याने २००९ मध्ये एकाची हत्या केली होती. त्याच्याविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल होता. हत्या केल्यानंतर तो फरार झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. फरार झाल्यानंतर तो बनसारपाडा येथील लाकडाच्या वखारीमध्ये काम करत होता. त्याला पुढील तपासासाठी शहापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.