ठाणे : ठाण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी या मित्रपक्षांमधील वाद वाढू लागला असतानाच राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी नमती भूमिका घेतल्याने हा वाद निवळण्याची चिन्हे आहेत. नव्या वर्षात महाविकास आघाडीचा धर्म पाळत आम्ही शिवसेना नेत्यांवर टीका करणार नाही. पण, त्यांनी टीका केली तर आम्ही त्याला प्रतिउत्तर देऊ असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
कळवा येथील खारेगाव भागातील रेल्वे उड्डाणपूल कामाच्या श्रेयावरून सेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही मित्रपक्षांत वाद सुरू आहे. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि महापौर नरेश म्हस्के यांनी कळव्यातील एका कार्यक्रमात बोलताना मिशन कळवा चा नारा दिला होता. त्याला राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी प्रतिउत्तर देत कमिशन टीएमसी मिशन राबविण्याची घोषणा केली होती. यामध्ये विविध प्रकल्पांच्या कामात घेण्यात आलेल्या दलालीबाबत प्रत्येक वॉर्डात जनजागृती करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्पष्ट केले होते. याच मुद्द्यावरून शिवसेनेचे नगरसेवक विकास रेपाळे, योगेश जानकर, उमेश पाटील यांनी परांजपे यांच्यावर जहरी टीका करत आरोप केले होते. त्यामुळे हा वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच परांजपे यांनी नमती भूमिका घेतली आहे. शिवसेनेच्या कळवा मिशन घोषणेला प्रतिउत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीचा शहराध्यक्ष या नात्याने प्रतिक्रिया देणे हे माझे कर्तव्य होते, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच नव्या वर्षात महाविकास आघाडीचा धर्म पाळत आम्ही स्वत: शिवसेनेवर, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर कोणतीही टीका करणार नाही. परंतु ते राष्ट्रवादीबद्दल काही बोलले तर त्याचे आम्ही प्रतिउत्तर देऊ असे त्यांनी स्पष्ट केले.