Ganeshotsav 2025 : ठाणे : गणेशोत्सवामुळे सर्वत्र आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे. मागील काही दिवसांपासून सर्वत्र विविध सामाजिक संदेश देणारे देखावे पाहायला मिळत आहेत. सार्वजनिक गणपती मंडळांसह घरगुती गणेशोत्सवात देखील विविध आकर्षक, सामाजिक संदेश देणारे देखावे अनेकांनी साकारले आहेत. दरम्यान नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील शेलार कुटुंबीयांनी हॅरी पॉटरची दुनियाच उभारली आहे.

गणेशोत्सव म्हणजे सर्वत्र नव चैतन्याचे वातावरण असते. गणेशाची प्रतिष्ठापना, नैवेद्य, घराची सजावट,रांगोळी, अलंकार अशा विविध गोष्टींची रेलचेल पाहायला मिळते. मागील काही दिवसांपासूनच गणेशोत्सवासाठी तयारी सुरू करण्यात आली होती. सर्व बाजार नवनवीन वस्तूंनी फुलून गेला होता. यामध्ये गणेशासाठी मखर नागरिकांच्या पसंतीस येत होते. असे असले तरी अनेकांनी गणेशासाठी घरात विविध संकल्पनेवर आधारित देखावे साकारल्याचे चित्र आहे. ठाण्यात जुन्या गडकरी रंगायतनचा इतिहास, स्मार्ट सिटी, पुस्तकातून देखावा असे विविध देखावे होते.

दरम्यान नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील शेलार कुटुंबीयांनी वाचनाची आवड आणि त्याच वाचनाचं आवडीतून हॅरी पॉटर कादंबरीतील दुनिया साकारली. या मध्ये प्लॅटफॉर्म 9 3/4, हॉगवर्ट्स एक्सप्रेस, हॉगवर्ट्स कॅस्टल, टनेल, असे विविध कलाकृती उभारण्यात आल्या आहेत. कागद, पुठ्ठे, प्लास्टिक बॉटल्स असा गोष्टी वापरून हा देखावा तयार केला आहे. हा देखावा तयार करण्यासाठी लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वजण सहभागी झाले होते. शेलार कुटुंबीय दरवर्षी विविध देखावे मांडत असतात.

जे. के. रोलिंग लिखित ‘हॅरी पॉटर’ कादंबरीत जे. के. रोलिंगच्या काल्पनिक दुनियेमध्ये अनेकजण रंगून जातात. हॅरी पॉटर ही ब्रिटिश लेखिका जे.के. रोलिंग यांनी लिहिलेल्या सात काल्पनिक कादंबऱ्यांची मालिका आहे. या कादंबऱ्या एका तरुण जादूगार हॅरी पॉटर आणि त्याचे मित्र रॉन वेस्ली आणि हर्मिओन ग्रेंजर यांच्या जीवनावर आधारित आहेत, जे सर्व हॉगवर्ट्स स्कूल ऑफ विचक्राफ्ट अँड विझार्ड्रीचे विद्यार्थी आहेत . मुख्य कथा लॉर्ड व्होल्डेमॉर्टशी हॅरीच्या संघर्षाशी संबंधित आहे, जो एक गडद जादूगार आहे जो अमर बनण्याचा, जादू मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जादूगार प्रशासकीय मंडळाला उलथून टाकण्याचाआणि सर्व जादूगार आणि मुगल (जादू नसलेले लोक) यांना वश करण्याचा प्रयत्न करत असतो.

हॅरी पॉटर ची दुनिया हा देखावा साकारण्यासाठी रिशान शेलार, सस्विन शेलार, शार्विल शेलार, नचिकेत गावंड, कुशल गावंड, मनोज शेलार, श्रीकांत शेलार, सुयोग शेलार, प्रचित गावंड , संवेदी म्हात्रे, ओंकार पाटील आणि शैलेश शेलार हे सहभागी झाले होते.