रेल्वे अर्थसंकल्पाने ठाणेपल्याड असलेल्या स्थानकांना काय दिले याची चर्चा, ऊहापोह पुढील काही दिवस सुरूच राहील. या अर्थसंकल्पाने या स्थानकांना काय द्यायला हवे होते आणि प्रवाशांच्या पदरी त्याच त्या घोषणांचा रतीब कसा पडत आहे, हा मुळी या लेखाचा उद्देश नाही. ठाणेपल्याड रेल्वे सेवा म्हटली की ठाणे, कल्याण-डोंबिवली अशा बडय़ा स्थानकांच्या पलीकडे फारसा विचार होताना दिसत नाही. गेल्या काही महिन्यांपासून मध्य रेल्वे प्रशासनाने या मोठय़ा स्थानकांमध्ये गुदमरलेल्या लहान स्थानकांच्या सोयी, सुविधांचा विचार सुरू केलाय हे एका अर्थाने सकारात्मक म्हणायला हवे. डोंबिवलीऐवजी ठाकुर्ली स्थानकाच्या दिशेने प्रवाशांनी आकृष्ट व्हावे यासाठी ठोस प्रयत्नांची गरज रेल्वे प्रशासनाला वाटू लागली आहे, ही आश्वासक बाब आहे. ठाकुर्लीसारखी गर्दी खेचणारी, परंतु सुविधांपासून वंचित राहिलेली अशी बरीच स्थानके या पट्टय़ात आपल्याला पाहायला मिळतात. दिवा हे अशा स्थानकांपैकीच एक. ठाकुर्ली, दिवा यांसारख्या स्थानकांना जंक्शनचा दर्जा देण्याची चर्चा सुरू होणे संपूर्ण ठाणेपल्याडच्या प्रवाशांसाठी सुदिन अवतरल्यासारखे आहे. या चर्चेची परिणती अंमलबजावणीत व्हावी इतकीच अपेक्षा आहे.
छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कर्जत-कसारा रेल्वे स्थानकांच्या दरम्यानची मध्यवर्ती स्थानके म्हणजे ठाणे ते कल्याण. रेल्वे प्रवाशांची सगळी वाहतूक मुंबईतून नियंत्रित केली जाते. त्यामुळे प्रवासी वाहतुकीचा सगळा भार मुंबईवर पडला आहे. जोपर्यंत या गर्दीच्या भाराची विभागणी केली जात नाही. तोपर्यंत लोकल कितीही वाढवल्या तरी या महत्त्वाच्या स्थानकांवरील गर्दीचा भार कमी होईल, याची खात्री नाही. असे असताना, रेल्वे प्रशासनाने ठाकुर्ली रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुंबई विकास रेल्वे महामंडळातर्फे ठाकुर्ली रेल्वे स्थानकात नवीन फलाट, पदपथ, सरकता जिना, संरक्षित भिंत, उन्नत तिकीट खिडकी असा सुमारे १७ कोटी रुपयांचा प्रकल्प आकार घेत आहे. ही कामे सुरू असतानाच रेल्वे मंत्रालयाने अर्थसंकल्पात ठाकुर्ली टर्मिनस उभारण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. केवळ कल्याण-डोंबिवली नव्हे तर मध्य रेल्वेच्या कर्जत, कसारा ते सीएसटी दरम्यान नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा दिलासादायक निर्णय आहे.
ठाकुर्लीचा विकास
डोंबिवली शहराचा पसारा शिळफाटा, २७ गाव परिसर, एमआयडीसी असा अवाढव्य आहे. या भागातील रहिवासी नोकरी, व्यवसायानिमित्त दररोज मुंबई, कर्जत, कसाऱ्याकडे जाण्यासाठी डोंबिवली रेल्वे स्थानकाचा वापर करतात. त्यामुळे डोंबिवली रेल्वे स्थानकातील सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंतची गर्दी हा लिम्का, गिनीज बुक रेकॉर्डमधील नोंदीचा विषय झाला आहे. नव्या वस्तीचा भार डोंबिवली रेल्वे स्थानकावर येत आहे. त्यामुळे ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरात प्रवासी सुविधा देण्याच्या प्रकल्पाला महत्त्व आहे. डोंबिवलीच्या गर्दीला कंटाळलेला जुना डोंबिवलीकर अनेक वेळा उलटा फेरा घेऊन ठाकुर्ली रेल्वे स्थानकात येऊन तेथून मुंबईचा प्रवास सुरू करतो. ठाकुर्ली रेल्वे स्थानकात मुंबईला जाणाऱ्या सकाळ, संध्याकाळच्या वेळेत काही जलद, अति जलद गाडय़ा थांबवण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून झाले तर या जलद गाडय़ांसाठी डोंबिवली स्थानकात जी गर्दी होते ती कमी होण्यास मदत होईल. एमआयडीसी, नेतिवली, सर्वोदय नगर, पेंडसेनगर, सारस्वत कॉलनी, पाथर्ली, ठाकुर्ली, डोंबिवली पश्चिमेतील गणेशनगर, राजूनगर, नवापाडा, कुंभारखाण पाडा भागातील चाकरमानी रेल्वे स्थानकातील वाढत्या सुविधांकडे पाहून ठाकुर्ली रेल्वे स्थानकाचा रस्ता धरतील. त्यामुळे ठाकुर्लीतील सुविधांकडे वरवर पाहून चालणार नाही. लहान स्थानकांना सुविधा पुरवा आणि मोठय़ांचा भार कमी करा, असे हे गणित आहे. हे गणित रेल्वे प्रशासनाला उशिरा का होईना उमगले आहे हे महत्वाचे.
कोपर रेल्वे स्थानक
डोंबिवलीजवळील आणखी एक महत्त्वाचे स्थानक म्हणजे कोपर. डहाणू, पनवेलकडे जाणाऱ्या प्रवाशांची सोय म्हणून काल-परवापर्यंत या स्थानकाकडे पाहिले जात होते. ठाकुर्लीच्या धर्तीवर या स्थानकाच्या विकासासाठी येत्या काही र्सवकष अशी योजना राबविण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत आहे. हादेखील वर म्हटल्याप्रमाणे लहान स्थानकांना सक्षम करणाऱ्या धोरणांचा एक भाग म्हणायला हवा. या स्थानकात काही जलद, अति जलद थांबवण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे. जलद, अतिजलद लोकल हा प्रवाशांचा जीव आहे. आठ वर्षे उलटूनही कोपर रेल्वे स्थानक ज्या प्रवासी क्षमतेने चालणे आवश्यक आहे तेवढी गर्दी खेचत नाही हे वास्तव आहे. या स्थानकात प्रवासी गरजा ओळखून सुविधा दिल्या तर कोपर, मोठागाव, टेल्कोसवाडी, देवी चौक, पूर्व भागात आयरे, कोपर, म्हात्रेनगर, भोपर, तुकारामनगर परिसरातील प्रवासी कोपर रेल्वे स्थानकात येतील. अर्थात डोंबिवलीची गर्दी कमी होईल.
आगासन स्थानक
विकासक लोढा यांच्या गृहप्रकल्प आराखडय़ात दिवा आणि निळजे गावांच्या दरम्यान आगासन रेल्वे स्थानक विकसित होणार असल्याचे चित्र अनेक वर्षांपासून दाखवले जाते. यापूर्वी आगासन येथे स्थानक नसताना गाडी थांबत असे. ग्रामस्थ आगासन रेल्वे स्थानक होण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. या रेल्वे स्थानकामुळे दिवा परिसरातील गावांमधील प्रवासी या स्थानकाचा लाभ घेतील. या भागातील नागरिकांना सध्या दिवा, डोंबिवली रेल्वे स्थानकांशिवाय पर्याय नाही.
कल्याणवरील भार
जी अवस्था डोंबिवलीची तीच अवस्था कल्याण रेल्वे स्थानकाची आहे. कल्याण रेल्वे स्थानकावर पूर्व, पश्चिम भागासह उल्हासनगर, भिवंडीपासूनच्या प्रवाशांचा भार पडत आहे. ठाकुर्ली रेल्वे स्थानक पूर्ण क्षमतेने विकसित झाले तर हा भार कमी होण्यास मदत होणार आहे. माणकोली उड्डाणपूल झाल्यानंतर खाडी भागातील प्रवासी कल्याणला जाण्याऐवजी डोंबिवली, ठाकुर्लीकडे येऊ शकतील. शहाड, विठ्ठलवाडी, आंबिवली स्थानकांमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या जलद, अति जलद गाडय़ा सकाळ, संध्याकाळ थांबवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून झाला तर येणाऱ्या काळात कल्याण रेल्वे स्थानक गर्दीतून थोडा फार मोकळा श्वास घेऊ शकेल.
आता झालंय काय?
’कल्याण, ठाकुर्ली परिसरात रेल्वेची सुमारे पाचशे ते सहाशे एकर जमीन आहे. कल्याण रेल्वे स्थानकाजवळील बहुतांशी जमीन मालगाडय़ा, रेल्वे वर्कशॉप, गोदाम यांमध्ये अडकून पडली आहे. येणाऱ्या काळात मालगाडय़ांसाठी स्वतंत्र मार्गिका होणार असल्याने अलीकडे कल्याण रेल्वे स्थानक भागात मालगाडय़ांच्या ज्या रांगा लागतात त्या कमी होतील.
’कल्याणमध्ये सध्या अडकून पडलेल्या जागेत रेल्वे प्रशासनाने टर्मिनस विकसित केले तर कल्याणहून कर्जत, कसारा येथे लोकल सोडणे, येथून लांब पल्ल्याच्या गाडय़ा सोडणे सोयीस्कर होईल. मुंबईवरील काही भार यामुळे हलका होईल. लोकलने मुंबईहून लटकत, लोंबकळत येणारा प्रवासी कल्याण रेल्वे स्थानकातून घरी जाताना किमान मोकळा श्वास घेईल.
’ठाकुर्ली रेल्वे स्थानकात स्वतंत्र निवासी फलाट, पादचारी पूल बांधण्यात येणार आहे. या स्थानकाच्या पूर्व, पश्चिम भागात रेल्वेने वाहनतळ बांधले तर प्रवाशांची मोठी सोय होईल. रेल्वे स्थानक भागात वाहनतळ नसणे ही प्रवाशांची अलीकडची मोठी गैरसोय आहे. आहेत ते वाहनतळ वाहनांनी ओसंडून जात आहेत. ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील रेल्वेचा पथदर्शी प्रकल्प कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकातील गर्दीचा भार कमी करण्यासाठी नक्कीच हातभार लावील. ठाकुर्लीप्रमाणे कोपर, विठ्ठलवाडी, शहाड, आंबिवली रेल्वे स्थानकांचा विकासाकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
भगवान मंडलिक
संग्रहित लेख, दिनांक 4th Mar 2015 रोजी प्रकाशित
कल्याण-डोंबिवली शहरबात : छोटे सक्षम तरच मोठे कार्यक्षम!
भगवान मंडलिकठाणेपल्याड रेल्वे सेवा म्हटली की ठाणे, कल्याण-डोंबिवली अशा बडय़ा स्थानकांच्या पलीकडे फारसा विचार होताना दिसत नाही.

First published on: 04-03-2015 at 01:06 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Need of small station development in thane district