डिजी ठाणे उपक्रमकरिता स्वारस्य अभिव्यक्ती निविदेला प्रतिसाद मिळेना

मोफत सुविधा पुरविणाऱ्या ठेकेदाराच्या शोधासाठी निविदेला पुन्हा मुदतवाढ

डिजी ठाणे उपक्रमकरिता स्वारस्य अभिव्यक्ती निविदेला प्रतिसाद मिळेना
ठाणे महापालिका ( संग्रहित छायाचित्र )

इस्त्रायलमधील तेल अवीव शहराच्या धर्तीवर ठाणे महापालिका प्रशासनाने सुरु केलेल्या ‘डिजी ठाणे’ या उपक्रमाकरिता ठेकेदाराला पैसे देण्याऐवजी हा उपक्रम मोफत चालविणाऱ्या ठेकेदाराचा प्रशासनाने शोध सुरु केला असून त्यासाठी पालिकेने काही दिवसांपुर्वी काढलेल्या स्वारस्य अभिव्यक्ती निविदेला ठेकेदाराकडून प्रतिसाद मिळालेला नसल्याची बाब समोर आली आहे. जेमतेम एकाच ठेकेदाराने निविदा भरल्यामुळे पालिका प्रशासनाने या निविदेला पुन्हा मुदतवाढ देऊ केली आहे. या मुदतीत तरी ठेकेदार मिळेल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

इस्त्रायलमधील तेल अवीव शहराच्या धर्तीवर ठाणे महापालिका प्रशासनाने ‘डिजी ठाणे’ हा उपक्रम तीन वर्षांपुर्वी सुरु केला आहे. शहरातील दोन लाख नागरिकांनी ‘डिजी ठाणे’ उपक्रमाच्या ॲपवर नोंदणी केली आहे. याशिवाय, ७०० हून अधिक आस्थापना आणि व्यापारी ॲपवर जोडले गेलेले आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून महापालिकेच्या विविध देयकांचा भारणा करणे, जन्म-मृत्यु दाखले देणे, मॉल तसेच अन्य आस्थापनांमध्ये ऑनलाईनद्वारे खरेदी करणे तसेच महापालिकेमार्फत शहरातील नागरिकांना महत्त्वाच्या सूचना करणारा संदेश देणे यासह इतर सुविधा पुरविण्यात येणार होत्या. त्यापैकी काहीच सुविधा ठाणेकरांसाठी सुरु झालेल्या असून त्यामध्ये कर भारणा तसेच महत्वाचे संदेश देणे या सुविधेचा समावेश आहे. या उपक्रमासाठी महापालिकेने २८ कोटी रुपयांची तरतुद केली होती. त्यापैकी १० टक्के रक्कम रोखून उर्वरित रक्कम ठेकेदाराला आतापर्यंत देण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात कामाची मुदत संपल्यानंतरही त्याने हे काम सुरुच ठेवले होते. करोना रुग्ण संख्येची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम ‘डिजी ठाणे’ उपक्रमाच्या ठेकेदाराने सुरु केले होते. तसेच यंदाच्या मार्च महिन्यात संबंधित ठेकेदाराने पालिकेला पत्र पाठवून मुदतवाढ देण्याची मागणी केली. त्यामध्ये हा उपक्रम दहा वर्षे चालविण्यासाठी होस्टींग शुल्कासह जाहिरात हक्क देण्याची मागणी केली होती. यानुसार पालिकेला होस्टींग शुल्कासाठी महिन्याला ४ ते ५ लाखांचा खर्च द्यावा लागणार असल्यामुळे पालिकेने त्यास नकार दिला होता. तसेच डिजी ठाणे उपक्रमांतर्गत सुरु असलेल्या सोयीसुविधा मोफत पुरविणाऱ्या ठेकेदाराचा शोध घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. त्यानुसार पालिकेने स्वारस्य अभिव्यक्ती देकार मागवून त्याद्वारे ठेकेदार नियुक्त करण्याची प्रक्रीया सुरु केली होती. जेमतेम एकाच ठेकेदाराने निविदा भरली असून यामुळे निविदा प्रक्रीयेस प्रतिसाद मिळाला नसल्याची बाब समोर आली आहे. यामुळे पालिकेने या निविदेला पुन्हा मुदतवाढ देऊ केली आहे.

‘डिजी ठाणे’ या उपक्रमाकरिता पालिकेने स्वारस्य अभिव्यक्ती निविदा काढली होती. २२ जुलै २०२२ रोजी ही निविदा काढण्यात आली होती. त्यात एकाच ठेकेदाराची निविदा प्राप्त झालेली आहे. या निविदेस ठेकेदाराकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे पालिकेने निविदेस २३ ऑगस्ट २०२२ पर्यंत मुदतवाढ देऊ केली आहे. या संबंधीची जाहीरात पालिकेने काढली आहे.

ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून डिजी ठाणे प्रकल्प ओळखला जातो. हा प्रकल्प काही वर्षांपुर्वी वादग्रस्त ठरला होता. महापालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या डिजी ठाणे हा उपक्रमाच्या कामाची निविदा संपुष्टात येण्याच्या आठ महिनेआधीच संबंधित ठेकेदाराला मुदतवाढ देऊन २२ कोटींचे देयक अदा केल्याचा आरोप झाला होता. याप्रकरणाची विधानसभेत चौकशी करण्याची मागणी झाली होती. त्यामुळे हा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. तत्कालिन आयुक्त जयस्वाल यांच्या स्वप्नवत प्रकल्पांपैकी एक असलेल्या डीजी ठाणे प्रकल्पातील ठेकेदार बदलासाठी पालिका स्तरावर हालचाली सुरु असून त्यासाठी पालिकेने स्वारस्य अभिव्यक्ती देकार मागवून या उपक्रमावर होणाऱ्या कोट्यावधी रुपयांच्या उधळपट्टीला लगाम घालण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

‘डिजी ठाणे’ या उपक्रमातर्गंत मोफत आणि दर्जेदार सुविधा पुरविणाऱ्या ठेकेदारांकडून स्वारस्य अभिव्यक्ती देकार मागविण्यात आले असून केवळ एकाच ठेकेदाराची निविदा प्राप्त झाल्याने त्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. – स्वरुप कुलकर्णी ,सिस्टम मॅनेजर, ठाणे महापालिका

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
डोंबिवली रेल्वे स्थानक भागातील घुसखोर वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी