ठाणे – सण-उत्सवाच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक दुकानांमध्ये खरेदीवर सवलती दिल्या जातात. त्याचप्रकारच्या सवलती आता पावसाळ्याच्या कालावधीत ठाणे शहरातील अनेक दुकानांमध्ये दिल्याचे दिसत आहेत. या दुकानांमध्ये खरेदींचा जणू पावसाळी महोत्सव भरला असल्याचे वाटतं आहे. पैठणी, हातमागच्या साड्या, सॉप्ट सिल्क, बनारसी अशा विविध प्रकारच्या साड्यांच्या खरेदीवर २० ते ५० टक्के पर्यंतच्या सवलती ग्राहकांना दिल्या जात असून ग्राहकांचा देखील या महोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हा महोत्सव ३१ जुलै पर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती काही विक्रेत्यांकडून देण्यात आली.
आषाढ महिन्यानंतर सुरू होणाऱ्या श्रावण सरींसह सण-उत्सवांच्या काळाची सुरुवात होत असते. रक्षाबंधन, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळी असे सण लागोपाठ येत असल्याने या काळात बाजारपेठांमध्ये चैतन्य निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. याकालावधीत बाजारात कपडे,इलेक्ट्रॉनिक्स वस्तू , गृहपयोगी वस्तू अशा विविध साहित्यांवर आकर्षक अशा सवलती ग्राहकांना दिल्या जातात. त्यामुळे सण- उत्सवाच्या काळात दुकानांमध्ये ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होते. परंतू, यंदा पावसाळा सुरु होताच ठाण्यातील दुकानांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची खरेदीला गर्दी होऊ लागली आहे.
सण-उत्सवाविना बाजारपेठेतील काही दुकानांमध्ये सवलतींचा हंगाम सुरु झाला आहे. सण-उत्सवाच्या कालावधी अनेकदा ग्राहकांना मनसोक्त खरेदी करता येत नाही त्यामुळे वर्षातून एकदा असा सवलतींचा हंगाम राबविला जातो. जेणेकरुन ग्राहकांना खरेदीसाठी पुरेसा वेळ मिळेल आणि मनसोक्त खरेदी करता येईल, असे एका विक्रेत्यांनी सांगितले.
ठाण्यातील नौपाडा भागात मोठ्याप्रमाणात साड्यांची दुकाने आहेत. याठिकाणी सर्वप्रकारच्या साड्या विक्रीसाठी उपलब्ध असतात. त्यामुळे ठाणे शहरासह इतर शहरातून देखील ग्राहक याठिकाणी खरेदीला येतात. यंदा पावसाळ्याच्या कालावधीत या दुकानदारांनी पैठणी महोत्सव, हातमागच्या साड्यांचे प्रदर्शन आणि विक्री भरविले आहे. तसेच बनारसी, सॉफ्ट सिल्क, कांजीवरम अशा विविध प्रकारच्या साड्यांवर २० ते ५० टक्क्यांची सवलत दिली आहे. यंदा पहिल्यांदाच हातमागच्या साड्यांवर ५० टक्के पर्यंतच्या विशेष सवलती देण्यात आल्याची माहिती ठाण्यातील काही दुकानदारांनी दिली.
प्रतिक्रिया
आमच्या दुकानात पैठणी महोत्सव भरविण्यात आला आहे. सर्व प्रकारच्या पैठणींवर २५ टक्के सवलत दिल्या जात आहेत. तर, हातमागच्या साड्यांवर यंदा प्रथमच ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. – अमित कारिया, कलानिधी.
आमच्याकडे कोणत्याही साडी खरेदीवर २० आणि ५० टक्के सवलत दिली जात आहे. यंदाच्या पावसाळ्यात आम्ही हातमागच्या साड्यांचे प्रदर्शन भरविले आहे. या प्रदर्शनाला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. – अल्पेश छाडवा, कलामंदिर.
सण-उत्सवाच्या आधी ग्राहकांना सवलती दिल्यामुळे ग्राहकांना मनसोक्त खरेदी करता येत आहे. खरेदी करताना त्यांच्यात हा उत्साह दिसून येत आहे. आमच्याकडे सर्व प्रकारच्या साड्यांवर २० टक्के सवलत देण्यात आली आहे. तर, ५० टक्के सवलतीचा देखील एक विभाग तयार करण्यात आला आहे. – प्रविण छेडा, हस्तकला.
ग्राहकांच्या हितकारीता या सवलती देण्यात आल्या असून ३० जुलै पर्यंत ग्राहकांना या सवलतींचा लाभ मिळणार आहे. आमच्याकडे कोणत्याही प्रकारच्या साडीच्या खरेदीवर ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. – रसिक बोरीचा, रंगोली सारीज्.