ठाणे : यंदाचे वर्ष हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जयंती वर्ष असल्यामुळे ठाणे शहरात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर महिला दिनाचे औचित्य साधून ठाणे शहरात महिलांसाठी प्रथमच ‘अहिल्या दौड’चे आयोजन करण्यात आले आहे. या दौडच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रयत्न अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त अहिल्यादेवींचे विचार, कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा सर्वस्तरीय संस्थांकडून प्रयत्न केले जात आहेत. श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित स्वागत यात्रेत देखील न्यासाकडून अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित चित्ररथ साकारण्याचे आवाहन संस्थांना करण्यात आले आहे. त्यानुसार, अहिलायदेवी होळकर त्रीवर्षीय समितीच्या वतीने यंदाच्या स्वागत यात्रेत अहिल्यादेवी होळकर यांचा चरित्ररथ साकारण्यात येणार आहे. त्यापार्श्वभूमीवर, या समितीच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून ‘अहिल्या दौड’ चे आयोजन केले आहे.

या संदर्भातील माहिती त्यांनी नुकत्याच झालेल्या स्वागत यात्रेच्या बैठकीत दिली. ही दौड उद्या, शनिवार रोजी सकाळी ७ वाजता मासुंदा तलावाजवळील पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुतळा येऊन निघणार असल्याची माहिती समारोह समितीच्या अध्यक्षा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज ॲड. रुचिका शिंदे यांनी दिली. या दौडमध्ये १२ वर्षावरील सर्व मुली आणि महिला या दौडमध्ये भाग घेऊ शकणार असून आत्तापर्यंत ५०० पेक्षा जास्त मुली आणि महिलांनी या दौडसाठी नोंदणी केली आहे. या दौडच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य जनसामन्यांपर्यंत पोहचावे हाच मुख्य उद्देश असल्याचे समिती मार्फत सांगण्यात आले.

असा असेल अहिल्या दौडचा मार्ग

पु. अहिल्यादेवी पुतळा, तलावपाळी येथून सुरुवात… दगडीशाळेजवळून डावीकडे… गजानन महाराज चौकातून तीन पेट्रोलपंपाच्या दिशेने… तीन पेट्रोलपंपाआधी घंटाळी देवी रोडला वळणे… साईबाबा मंदिरानंतर डावीकडे गडकरी पथावर… पु ना गाडगीळ चौकातून तलावपाळीकडे… उजवीकडून तलावाला प्रदक्षिणा घालून जांभळीनाका मार्गे परत पु. अहिल्यादेवी पुतळ्याकडे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On occasion of womens day first ever ahilya daud for women has been organized in thane city sud 02