कल्याण – शिळफाटा रस्त्यावरील पलावा चौकाजवळील तीन वर्षापासून संथगतीने काम सुरू असलेला दिवा-पनवेल रेल्वेमार्गावरील काटई निळजे उड्डाण पूल शुक्रवारी उद्घाटनाचा डांगोरा न पिटता एका साध्या कार्यक्रमाच्या माध्यमातून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पलावा चौक ते निळजे, काटई चौक दरम्यानची वाहतकू कोंडी सोडविण्यासाठी हा उड्डाण पूल महत्वाची भूमिका बजावणार आहे.
कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी जून अखेरपर्यंत काटई निळजे रेल्वे उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला होईल असे आश्वासन प्रवाशांना दिले होते. काही तांत्रिक अडथळे, स्थापत्य कामामुळे पूल जून अखेरपर्यंत एमएमआरडीएला वाहतुकीसाठी सुरू करता आला नव्हता. दिलेले आश्वासन आमदार मोरे यांनी न पाळल्याने ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, मनसेचे नेते राजू पाटील यांच्या पुढाकाराने काही दिवसांपूर्वी पलावा चौक भागात संयुक्त मोर्चा काढून काटई निळजे उड्डाण पुलाचे काम लवकर पूर्ण करून या भागातील कोंडीला पूर्ण विराम द्या. अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.
काटई निळजे रेल्वे उड्डाण पुलामुळे काटई जवळ तीन उड्डाण पुलांच्या वाहिका वाहनांसाठी उपलब्ध झाल्या आहेत. यापूर्वी पलावा चौक, काटई चौकातून धावणारी वाहने एक्सपेरिया व्यापारी संकुलाजवळील दोन उड्डाण पुलांच्या वाहिकांच्या कोंडीत अडकत होती. ही कोंडी सोडविण्यासाठी नवीन पुलाचे काम सुरू होते.
या पुलाचे काम लवकर पूर्ण करावे म्हणून माजी आमदार राजू पाटील शासनाकडे सतत पाठपुरावा करत होते. ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे यांनीही हे काम लवकर पूर्ण व्हावे म्हणून शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. आमदार राजेश मोरे यांनीही हे काम लवकर पूर्ण करावे म्हणून एमएमआरडीए अधिकाऱ्यांकडे तगादा लावला होता.
काटई निळजे रेल्वे मार्गावरील (पलावा चौक) नवीन उड्डाण पुलाचे काम दोन दिवसापूर्वीच पूर्ण झाले. या पुलाच्या उद्घाटनाचा डांगोरा न पिटता हा पूल तात्काळ खुला करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना दिल्या. शुक्रवारी सकाळी आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, सदानंद थरवळ, शहर सचिव संतोष चव्हाण, अर्जुन पाटील, गुलाब वझे, दत्ता वझे, नरेश पाटील, बंडू पाटील, गजानन पाटील, छाया पाटील, कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर स्थानिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नवीन उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
काटई निळजे उड्डाण पूल खुला झाल्याने वाहतूक पोलिसांची पलावा चौक भागातील वाहतूक कोंडीची डोकेदुखी कमी होण्यास मदत होणार आहे.
आम्ही नुसते कागदी घोडे नाचवित नाहीत. आम्ही प्रत्यक्ष कृती करतो. लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी रस्त्यावर उतरतो. इतर टीकाकारांसारखी आमची कृती नसल्याने, काटई निळजे रेल्वे उड्डाण पुलाचे काम शिवसेना नेत्यांच्या पाठपुराव्यामुळे पूर्ण होऊन हा पूल वाहतुकीसाठी खुला झाला. – राजेश मोरे, आमदार