पुनरेपणासाठी जागेचा शोध सुरूच

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : मुंबई-अहमदाबाद द्रुतगती अर्थात बुलेट ट्रेन प्रकल्पाने तब्बल दीड लाख खारफुटीच्या रोपांची कत्तल होणार आहे. त्यांचे पुनरेपण नेमके कुठे आणि कसे करावे, याबाबत रेल्वे मंडळाकडे अद्याप ठोस आराखडाही तयार नसल्याचे उघड झाल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये असंतोष आहे.

भारतीय खारफुटी महामंडळाने राष्ट्रीय द्रुतगती रेल्वे महामंडळाकडे सादर केलेल्या प्राथमिक अहवालात या कत्तलीची व्याप्ती नोंदल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. या बुलेट ट्रेन प्रकल्पाने होणाऱ्या पर्यावरण ऱ्हासाविषयी पर्यावरणप्रेमींमध्ये आधीच तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात हा ऱ्हास रोखण्यासाठी सरकारी पातळीवर ठोस योजनाच नसल्याने या असंतोषात भर पडत आहे.

मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातून सुरू होणारा बुलेट ट्रेनचा प्रवास ठाणे खाडीमार्गे बोगद्यातून होणार आहे. मात्र यामुळे ठाणे खाडीतील तिवरांच्या जंगलांना कोणतीही बाधा पोहोचणार नाही, असा दावा भारतीय खारफुटी महामंडळाकडून केला जात आहे. असे असले तरी मुंबईतील मिठी नदी तसेच उल्हास, वैतरणा आणि गुजरातमधील नर्मदा नदीपात्रातून या मार्गाचा प्रवास संवेदनशील अशा सहा ‘सीआरझेड’ क्षेत्रातून होणार आहे. यादरम्यान तब्बल दीड लाख खारफुटींची कत्तल होईल, असा प्राथमिक अहवाल खारफुटी महामंडळाने सादर केला आहे.

हा खारफुटीचा पट्टा प्रामुख्याने मुंबई तसेच ठाणे खाडीच्या पलीकडे उल्हास आणि वैतरणा नदीपात्रालगत असल्याचे सूत्रांनी सांगितले. न्यायालयाच्या मानकांनुसार कत्तलीच्या पाचपट पुनरेपण करावे लागते. त्यामुळे तब्बल सात लाख खारफुटींचे पुनरेपण केले जाणार असून त्यासाठी ९४ हेक्टर इतक्या विस्तीर्ण क्षेत्राची आवश्यकता आहे. हे पुनरेपण कुठेही आणि कसेही करता येत नाही. ते शास्त्रशुद्ध रीतीनेच करावे लागते. त्यामुळे या पुनरेपणासाठी स्वतंत्र अभ्यास केला जात असून ठाणे जिल्ह्य़ातील खाडीकिनारी काही नव्या जागांचा शोधही सुरू करण्यात आला आहे, असे सांगण्यात येते. ठाण्याप्रमाणेच नवी मुंबई, भिवंडी, कल्याण-डोंबिवली तसेच पालघर जिल्ह्य़ातील काही पट्टय़ातही जागांचा शोध सुरू असून येत्या काळात यासंबंधीचा सविस्तर आराखडा तयार केला जाईल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आग्रहाने आखण्यात आलेल्या या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा प्राथमिक पर्यावरण सुसाध्यता अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला असून त्यानुसार पालघर, ठाणे आणि मुंबईत पर्यावरणप्रेमी नागरिक आणि संस्थांकडून हरकती तसेच सूचना मागविण्यात येत आहेत. पर्यावरण संस्था आणि प्रेमींच्या दृष्टीने वनजमीन तसेच खारफुटीचा होणारा ऱ्हास हा चिंतेचा विषय ठरला असून प्राथमिक टप्प्यात सादर करण्यात आलेल्या सुसाध्यता अहवालात रेल्वे महामंडळाने त्याबाबत ठोस माहिती दिली नसल्याने संभ्रम अधिकच वाढला आहे.

बोगदा आणि गदा

५०८ किलोमीटर अंतराच्या या प्रकल्पात २५.४८ किलोमीटर लांबीचे तब्बल आठ बोगदे असून सर्वात मोठा २० किलोमीटर लांबीचा बोगदा ठाणे खाडीच्या खालून ३० मीटर खोल अंतरावरून जाणार आहे. हा बोगदा इतका खोलवर असल्याने तेथील खारफुटीवर गदा येणार नाही, असा दावा खारफुटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी करीत आहेत. मात्र त्याबाबत पर्यावरणप्रेमी साशंक आहेत. याशिवाय महाराष्ट्रात वनांनी व्यापलेली ७७.४५ हेक्टर जमीन, ज्यामध्ये १८.९८ हेक्टर जमीन खारफुटीची आहे, तीदेखील बाधित होणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One and a half million mangroves trees to cut for bullet train project